भूषण सुके
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतमालाचे उत्पादन वाढविण्याच्या नादात रासायनिक खताचा अताेनात वापर सुरू झाला. त्यामुळे पिकांचा उत्पादन खर्च वाढला असून, उत्पादन घटत चालले आहे. यातून जमिनीचा पाेत खालावत चालल्याने शेतकऱ्यांना नवीन समस्येला ताेंड द्यावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी आता पूर्वीप्रमाणे शेणखताच्या वापरावर भर देत आहेत. एकीकडे गुरांचे प्रमाण कमी झाल्याने व दुसरीकडे मागणी वाढत असल्याने शेणखताला चांगली किंमत मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात साधे शेणखत साडेचार ते पाच हजार रुपये प्रति ट्राॅली मिळत असून, प्रक्रिया केलेले शेणखत १२ हजार ते २० हजार रुपये प्रति ट्राॅली विकले जात आहे.
शेतकरी साधारणत: साधे शेणखत वापरण्यावर भर देतात. त्यामुळे शेतात वाळवी व हुमणी या किडींचा उपद्रव वाढण्याची शक्यता बळावते. हा उपद्रव टाळण्यासाठी शेणखतावर ‘फर्मेन्टेशन’ व ‘रिफर्मेन्टेशन’ ही प्रक्रिया करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेमुळे शेणखताचे तापमान कमी हाेऊन गंध नाहीसा हाेतो. त्यात नायट्राेजन, फाॅस्फरस, पाेटॅश, झिंक, बाेराॅन, फेरस, मॅग्नेशियम यासह अन्य सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढत असून, त्यातील वाळवी व हुमणी या किडी, त्यांची अंडी व काेष नष्ट हाेतात.
जमिनीत मित्र जीवाणू व बुरशीचे प्रमाण हळूहळू वाढल्याने तसेच शत्रू बुरशी व जीवाणू नाहीसे हाेत असल्याने पिके राेगांना फारशी बळी पडत नाही. शिवाय, पाण्याचा निचरा व्यवस्थित हाेत असल्याने जमिनीची धूप थांबते व तापमान स्थिर राहण्यास मदत हाेते. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा ‘सामू’ बदलण्यास अडथळा निर्माण हाेत असल्याने शेतजमीन ॲसिडिक, अल्कलाईन किंवा क्षारयुक्त हाेत नाही. जमिनीचे आराेग्य निकाेप ठेवण्यासाठी शेणखतासाेबतच गांडूळ, कम्पाेस्ट व हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्यक आहे, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
....
रासायनिक खतांचे पिकांवर दुष्परिणाम
रासायनिक व मिश्रखताच्या अतिवापरामुळे जमिनीचा पाेत खालावला असून, उत्पादकता कमी झाली आहे. जमिनीतील जैवविविधता धाेक्यात आली असून, घातक बुरशी व जीवाणूचे प्रमाण वाढत असल्याने पिकांना धाेका निर्माण हाेताे. घातक बुरशीमुळे जमिनीत पाण्याचा निचरा हाेण्याचे प्रमाण मंदावते. जमिनीच्या तापमानात वाढ हाेत असल्याने त्याचा पिकांवर विपरीत परिणाम हाेताे.
....
शेणखताचा फायदा
शेणखताच्या वापरामुळे जमिनीतील जैवविविधता शाबूत राहत असल्याने पाेत सुधारताे. पाण्याचा व्यवस्थित निचरा हाेताे. मातीचे संवर्धन हाेऊन आराेग्य सुधारते. गांडूळ व हिरवळीच्या खताचा वापर केल्यास जमिनीच्या सुपीकतेत आणखी वाढ हाेते. प्रक्रिया केलेल्या शेणखताचा वापर केल्यास पिकांना आवश्यक असलेले सर्व सूक्ष्म व इतर अन्नद्रव्ये सहज उपलब्ध हाेतात.
.....
रासायनिक आणि शेणखताचे दर
जिल्ह्यात साधे शेणखत प्रति ट्राॅली साडेचार ते पाच हजार रुपयामध्ये मिळते. हेच शेणखत प्रक्रिया अर्थात ‘फर्मेन्टेशन’ केलेले असल्यास त्याची किंमत वाढत असून, ‘रिफर्मेन्टेशन’ केलेले शेणखत २० हजार रुपये ट्राॅलीप्रमाणे विकले जात आहे. युरियाचे दर प्रति क्विंटल ६२० रुपये असून, मिश्रखताचे भाव प्रति क्विंटल १,९०० रुपये ते २,५०० रुपये आहेत.