नागपूर : ‘कोरोना’ संसर्गामुळे लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’चा फटका खेळणी उद्योगाला बसला आहे. खेळण्यांच्या किमतीमध्ये सरासरी ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. चायनीज खेळण्याची आवक कमी झाल्यामुळे बाजारपेठेत अनेक खेळण्यांची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे.
चीनमधून येणाऱ्या खेळण्यांच्या तुलनेत भारतात उत्पादित होणाऱ्या खेळण्यांची किंमत ३ टक्क्याहून अधिक असते. चीनमधील खेळण्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असते व त्यामुळे मुले त्याकडे जास्त आकर्षित होतात. चीनच्या खेळण्यांची आयात कमी झाली व त्यामुळे खेळण्याच्या किमती वाढल्या आहेत.
खेळण्यांची आवक कमी झाल्याचा फटका बाजाराला बसला आहे. ठोक विक्रेत्यांच्या फायद्याची टक्केवारी कमी झाली आहे. चीनमध्ये बनलेल्या खेळण्यांमुळे ठोक विक्रेत्यांना २० ते २५ टक्के फायदा होत होता. मात्र त्यात घट झाली आहे. अगोदर चायनीज खेळण्यांमध्ये जास्त ‘मार्जिन’ असायची. आता मात्र ती स्थिती राहिलेली नाही, अशी माहिती विक्रेते विक्रम अनिल यांनी दिली.
दुसरीकडे ऑनलाईन विक्रीचेदेखील प्रमाण वाढले आहे. त्यांच्या किमतीदेखील जास्त असतात. ‘कोरोना’मुळे लोक प्रत्यक्ष बाजारात न जाता ‘ऑनलाईन’ खेळणी मागवीत आहेत. याचा फटका ठोक विक्रेत्यांना बसतो आहे, अशी माहिती मोहम्मद शादाब यांनी दिली.