लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : मागासवर्गीय घटकातील प्रत्येक नागरिकांना रमाई घरकुल याेजनेंतर्गत घरकुल मिळत असले तरी या याेजनेचा लक्ष्यांक कमी असल्याने त्याचा लाभ मिळत नाही. परिणामी, हजाराे लाभार्थींना घरकुलापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे राज्य शासनाने घरकुल याेजनेचे लक्ष्यांकामध्ये वाढ करावी, अशी मागणी नागरिकांसह अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल घरडे यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.
मागासवर्गीयांना विविध याेजनांमार्फत तसेच रमाई घरकुल याेजनेंतर्गत बाैद्धांना घरकुल दिले जाते. मात्र, यात लाभार्थी संख्या कमी असल्याने शेकडाे लाभार्थी याेजनेपासून वंचित राहत आहेत. यामुळे अनेकांकडे घर नाही अथवा नागरिकांना पडक्या घरात वास्तव्य करावे लागत आहे. यासाठी राज्य शासनाने प्रत्येकाला घरकुल मिळावे म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत केवळ दाेन किंवा तीन नागरिकांना दरवर्षी लाभ दिला जाताे. त्यामुळे उर्वरित गरजूंना घरकुलासाठी काही वर्षे प्रतीक्षाच करावी लागते. दुसरीकडे राज्य व केंद्र शासनातर्फे मंजूर लाभार्थींना घरकुलाचा निधी दिला जात नाही, त्यामुळे अनेकांची काेंडी हाेत आहे.
घरकुल मंजूर झाल्यानंतर सुरुवातीला फक्त ३५ हजारांचा निधी लाभार्थींला दिला जाताे. त्यानंतर घराच्या बांधकामानुसार निधी मंजूर केला जाताे; परंतु मागील वर्षापासून अनेक लाभार्थींना घरकुलाचे काम पूर्ण हाेऊनही निधी दिला नाही. त्यामुळे त्यांच्या कर्जबाजारी हाेण्याची वेळ आली आहे. शासनाने निधी देऊन घरकुलाचे लक्ष्यांक वाढविल्यास हजाराे नागरिकांना त्याचा लाभ हाेईल, असेही पत्रात म्हटले आहे.