नागपूर : विविध कंपन्यांमध्ये पारंपारिक अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांच्या निवडीचे प्रमाण वाढवा, असे आवाहन कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी शिक्षकांना केले. विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने टीसीएस सोबत समन्वयाने गुरुनानक भवन येथे विद्यार्थी व शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यावेळी कुलगुरूंनी शिक्षकांसोबत संवाद साधला.
कुलगुरू डॉ. चौधरी म्हणाले, कंपनी समोर मुलाखतीपूर्वी विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करून घ्या. विद्यार्थी व कंपनी दरम्यान असलेली दरी दूर करण्याचे काम शिक्षकांना करावयाचे आहे. टीसीएस कंपनीमध्ये निवड झालेल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावेळी कार्यशाळेकरिता टीसीएसचे अकॅडमी इंटरफेस प्रोग्राम रीजनल हेड सौरभ लखोटे, बँकिंग फायनान्स बिजनेस युनिट (बीएएफएसआय) चे सागर बागडे, काॅग्निटिव्ह बिझनेस युनिट (सीबीओ) रितेश कुमार, काॅग्निटिव्ह बिझनेस युनिटचे पियुष अग्रवाल, गौरी दुर्गे, विद्यापीठाचे रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन, अनिकेत गभणे उपस्थित होते. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनीही मार्गदर्शन केले.