लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात मान्सूनला धडाक्यात सुरुवात झाली. पहिल्या दोन-तीन दिवस चांगला पाऊस झाला. परिणामी जलाशयांमधील साठेही भरू लागले आहेत. नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये आज तारखेत (१७ जून ) रोजी ४२.२६ टक्के इतका पाणीसाठा आहे. यात पाच मोठी धरणे ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत, हे विशेष.नागपूर विभागात एकूण १८ मोठी जलाशये (प्रकल्प) आहेत. याची एकूण पाणीसाठ्याची क्षमता ३५५२.८९ दलघमी इतकी आहे. यात आजच्या तारखेला (१७ जून) १५०१.३८ दलघमी म्हणजे ४२.२६ टक्के इतका पाणीसाठा आहे. जिल्हानिहाय जलसाठ्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पात ७४.७४ टक्के, कामठी खैरी ८४.६३, रामटेक (खिंडसी) १४.४५, लोअर नांद २३.३०, वडगाव ४८.५३ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ३०.९७ टक्के, सिरपूर २०.९१ , पुजारीटोला ६५.८४, कालीसरार ००, धापेवाडा बॅरेज टप्पा-२ मध्ये २४ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ७८.६७ टक्के, गडचिरोलीतील दिना प्रकल्पात २१.२८ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर धरणात ४२.५० टक्के, धाम ३८.२८, पोथरा २२.६१ टक्के, लोअर वर्धा ५९.६९ टक्के, भंडारा जिल्ह्यातील बावनथडी २९.०९ टक्के आणि गोसेखुर्द प्रकल्पात ३.५४ टक्के इतका पाणीसाठा आहे.
मध्यम प्रकल्पही ३३ टक्के भरलेनागपूर विभागातील मध्यम प्रकल्पही हळूहळू भरू लागले आहेत. सध्याच्या स्थितीत मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण ३३.९ टक्के इतका पाणीसाठा आहे. विभागात एकूण ४० मध्यम स्वरूपातील प्रकल्प आहेत. याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३६.४७ दलघमी इतकी आहे. यात आज १७ जून रोजी १७७.५१ दलघमी इतका पाणीसाठा जमा झालेला आहे.