नागपूर : तब्बल नऊ वर्षांनंतर होणाऱ्या कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) निवडणुकीत सर्वच पक्षांच्या सहभागाने रंगत वाढली आहे. २४ सप्टेंबर फॉर्म विक्री आणि भरण्याचा अखेरचा दिवस असून, २३ पर्यंत चार दिवसात १२१ फॉर्म विक्री होऊन ३७ जणांनी भरले आहेत. अखेरच्या दिवशी ४ वाजेपर्यंत फॉर्म विक्री आणि भरण्याला वेग येणार आहे. बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावल्याचे दिसून येत आहे.
हायकोर्टाच्या आदेशानंतर कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर सर्वच काँग्रेस, भाजपसह आता शिवसेनेही रिंगणात उडी घेतली असून, पॅनल लढविण्याची तयारी चालविली आहे. पण २४ सप्टेंबरनंतर स्वतंत्र आणि कोणत्या पक्षाचे पॅनल राहतील, ही बाब स्पष्ट होणार आहे. सर्वच पक्ष निवडणुकीसाठी रणनीती आखत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
२० सप्टेंबरपासून फॉर्म विक्री सुरू झाली असून, चार दिवसात १२१ फॉर्म विकले गेले. पहिल्या दिवशी २७, दुसऱ्या ४४, तिसऱ्या २८ आणि चौथ्या दिवशी २२ फॉर्मची विक्री झाली. याशिवाय उमेदवारांनी बुधवारी एक फॉर्म, गुरुवारी ३६ असे एकूण ३७ फॉर्म भरले आहेत. यामध्ये सेवा सहकारी संस्थाच्या मतदारसंघातून सर्वसाधारण गटात ११, महिला गटात ३, इतर मागासवर्गीय एक आणि विमुक्त जाती व जमाती गटात दोन फॉर्म जमा झाले, तर ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारण गटात सहा, अनुसूचित जाती-जमाती गटात दोन आणि आर्थिक दुर्बल घटकातून दोन उमेदवारांनी अर्ज भरले. याशिवाय अडतीया-व्यापारी मतदारसंघात पाच आणि हमाल-मापारी मतदारसंघात पाच उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत. या निवडणुकीत २३ ऑक्टोबरला मतदान होऊन २४ रोजी समिती पाच वर्षांसाठी कुणाच्या ताब्यात राहील, हे चित्र स्पष्ट होणार आहे.