नागपूर : कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली असली तरी, विद्यार्थ्यांना गुणदान करायचे आहे. हे गुणदान नववीच्या निकालाबरोबरच, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व दहावीचे अंतिम तोंडी प्रात्यक्षिक मूल्यमापन या आधारे करायचे आहे. हे गुणदान केल्यानंतर विद्यार्थ्यांचा डाटा ऑनलाईन मंडळाने दिलेल्या संकेतस्थळावर फीड करायचा आहे. परंतु ऑनलाईन संकेतस्थळासंदर्भात तक्रारी वाढल्या असून, २ जुलैपर्यंतचा कालावधी शिल्लक आहे. त्यानंतर संकेतस्थळ बंद होणार आहे.
मंडळाने मूल्यांकनासंदर्भात मुख्याध्यापक व शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले होते. मूल्यांकनासंदर्भात शाळेला नियमावली करून देण्यात आली होती. त्या आधारे शाळांनी मुलांचे गुणदान करायचे होते. बहुतांश शाळांची गुणदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांना मिळालेली गुण मुख्याध्यापकांनी विषय निहाय मंडळाच्या संगणकीय प्रणालीत भरायची आहे. यासाठी २ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्यासाठी मंडळाने ँ३३स्र२://ेँ-२२ू.ंू.्रल्ल दिलेल्या या संकेतस्थळावर गुण अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर संगणक प्रणाली हाताळण्यासंदर्भात मार्गदर्शिकाही दिलेली आहे. त्या अनुषंगाने शिक्षकांनी गुणदान करावे, असे आवाहन नागपूर विभागीय मंडळाच्या सचिव माधुरी सावरकर यांनी केले आहे.