लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यासह नागपूर शहरात कोविडचे संकट नियंत्रणाबाहेर चालले आहे. शासकीय यंत्रणा व नागपूर महापालिका प्रशासन सद्यस्थिती हाताळण्यास सक्षम नसल्याचे दिसत आहे. प्रशासनाच्या विसंगत धोरणामुळे कोरोना संकटात वाढ होत चालली आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.बावनकुळे म्हणाले, लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले पॉझिटिव्ह रुग्णाना वास्तविकता गृह-विलगीकरणात ठेवायला हवे असे दिशानिर्देश न्यायालयानेसुद्धा दिले आहेत. कोविड रुग्णालयांनी तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची देखभाल करणे अपेक्षित असताना नागपूर महापालिका आपल्या संसाधनांवर अनावश्यकरीत्या ताण देऊन लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयात भरती करून जनतेच्या पैशांचा अपव्यय करीत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांचे नविनीकरण व कोविड तयारीबाबत प्रसार माध्यमांतून बरीच प्रसिद्धी केली. पुढे काय झाले हे कुणालाच माहीत नाही. या रुग्णालयात कोविडचे रुग्ण का म्हणून दाखल करून घेण्यात येत नाहीत, या रुग्णालयांच्या पुनर्विकासावर किती रक्कम खर्च करण्यात आली, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. काटोल रोडवर राधास्वामी सत्संगच्या जागेत पाच हजार खाटा तयार करण्यात आल्या होत्या. त्याचीही बरीच प्रसिद्धी करण्यात आली. जेव्हा या सुविधांचा वापरच करण्यात आला नाही तर जनतेच्या पैशांचा झालेल्या अपव्ययाला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केला.रहिवासी क्षेत्रातील खासगी रुग्णालये ही फक्त कोविड व्यतिरिक्त आजाराच्या रुग्णांसाठी राखीव ठेवावीत. एखाद्या खासगी रुग्णालयाचा भाग जरी कोविड रुग्णालय म्हणून वापरला तर इतर रुग्ण भीतीपोटी त्या रुग्णालयाच्या नॉन-कोविड भागात जाणारसुद्धा नाहीत. खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णामुळे जर कोविड रहिवासी क्षेत्रात पसरला तर पुढे उत्पन्न होणाऱ्या विपत्तीला जबाबदार कोण राहणार? असले विसंगत निर्णय कोण घेत आहे, असे प्रश्नही बावनकुळे यांनी उपस्थित केले.
प्रशासनाच्या विसंगत धोरणामुळे कोरोना संकटात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 10:55 PM
राज्यासह नागपूर शहरात कोविडचे संकट नियंत्रणाबाहेर चालले आहे. शासकीय यंत्रणा व नागपूर महापालिका प्रशासन सद्यस्थिती हाताळण्यास सक्षम नसल्याचे दिसत आहे. प्रशासनाच्या विसंगत धोरणामुळे कोरोना संकटात वाढ होत चालली आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
ठळक मुद्दे चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप : मनपा रुग्णालयांचा उपयोग काय ?