नागपूर : मिहान-सेझमध्ये प्रारंभी सुरू झालेल्या उद्योगासाठी विजेचे प्रति युनिट दर २.८५ रुपये होते. त्यानंतर त्यात वाढ होत गेली. आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) चालू आर्थिक वर्षांत विजेचे दर आणि फिक्स चार्जेस वाढवून उद्योगांच्या अडचणीत भर टाकली आहे. या भागात नवीन कंपन्या आणायच्या असेल तर वीजदराच्या गंभीर मुद्दावर तोडगा काढण्याची उद्योजकांची मागणी आहे.
प्रति एचपी ३५० रुपये फिक्स चार्ज हा अन्यायच
प्रारंभी विजेचे दर प्रति युनिट २.८५ रुपये होते. त्यानंतर वाढून ४.३९ रुपयांवर गेले. त्यात ३.३९ रुपये युनिट आणि १ रुपये बिलिंग चार्जचा समावेश होता. हे दर पाच वर्षांपासून स्थिर होते. पण आता चालू आर्थिक वर्षांपासून विजेचे दर ४.३९ रुपयांवरून ४.८९ रुपयांपर्यंत वाढले आहेत. महत्त्वाची बाब अशी की, एमएडीसीने उद्योगांपासून ३५० रुपये प्रति एचपी आकारणे सुरू केले आहे. त्याचा अतिरिक्त भार उद्योजकांवर बसला आहे. तो उद्योजकांवर अन्याय आहे. फिक्स चार्ज आकारू नयेच, अशी इंडस्ट्री असोसिएशनची माणगी आहे.
उद्योजकांवर विजेचे संकट
उन्हाळ्यात मिहान आणि परिसरातील लाईन वारंवार ट्रीप (बंद) होत असल्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. उन्हाचे तापमान वाढल्यामुळे कंपन्यांच्या केबल लाईनमध्ये अडचणी येत आहे. तापमान अचानक वाढल्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे.
वेगवेगळ्या उद्योगांसाठी किमान १० झोन असावे
विशेष आर्थिक क्षेत्रात (सेझ) प्रत्येक उद्योग क्षेत्रासाठी वेगवेगळे किमान १० झोन असावेत. त्यामुळे या भागात नवीन कंपन्या येतील आणि मिहान-सेझचा विकास गतीने होईल. आता या क्षेत्राला १५ ते १६ वर्ष झाली आहेत. राज्य सरकारला नवीन योजना राबविण्याची गरज आहे. तरच रोजगारात वाढ होईल, असे मिहान इंडस्ट्री असोसिएशने म्हटले आहे.
उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे मिहान-सेझच्या काही भागात लाईन ट्रीप होत आहे. असे उन्हाळ्यात घडते. त्यामुळे अनेकदा उद्योगांसमोर संकट उभे राहात आहे. विजेची दरवाढ आणि फिक्स चार्जेस आकारणीमुळे उद्योग अडचणीत आले आहेत.मनोहर भोजवानी, अध्यक्ष, मिहान इंडिस्ट्रीज असोसिएशन.
मिहान-सेझमध्ये उद्योगांना विजेचा अखंड पुरवठा होत आहे. पुरवठा खंडित झाल्याची कुठलीही तक्रार नाही. उद्योजकांनी खंडित वीज पुरवठा करण्याची तक्रार एमएडीसीच्या कार्यालयात करावी.समरेश चॅटर्जी, मुख्य अभियंता, एमएडीसी.