नागपूर : नवतपाच्या चाैथ्या दिवशी चिडचिड करणाऱ्या नागपूरकरांना उष्णतेचा सामना करावा लागला. शुक्रवारच्या तुलनेत तापमान ०.६ अंशाने घटले व ४२ अंशाची नाेंद करण्यात आली. सकाळी ६० टक्के असलेली आर्द्रता सायंकाळपर्यंत ४३ टक्क्यांवर पाेहोचली. दुपारी आकाशात ढग जमा झाले हाेते. पण, उन्हाचे चटकेही बसले. मिश्रित वातावरणामुळे हवामान दमट झाले हाेते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार नवतपाच्या उरलेल्या दिवसांतही पारा ४१ ते ४२ अंशाच्या आसपास राहील आणि आकाशात ढगांची उपस्थितीही असेल. त्यामुळे नवतपाच्या काळात सूर्याचा प्रकाेप हाेण्याची शक्यता कमीच आहे. असे असले तरी थाेडी उष्णता कायम असून नागरिकांना दमट वातावरणाचा सामना करावा लागत आहे. विदर्भात ४४ अंशासह चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक हाेते. याशिवाय इतर जिल्ह्यात पारा ४० ते ४२ अंशाच्या आसपास कायम आहे. नागपुरात रात्रीचे किमान तापमान २.७ अंशाने वाढून २८.४ अंशावर पाेहोचले. सध्या दिवसासह रात्रीचे तापमानही सामान्य स्तरावर असल्याचे दिसून येत आहे. पुढचे काही दिवस हे वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शिवाय वादळ वाऱ्यासह पावसाची शक्यताही वर्तविली आहे.