सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना काळात कुपोषणग्रस्त बालकांसाठी पोषण आहार व अमृत आहार योजना सक्षमपणे राबविण्याचा दावा केला जात आहे; परंतु त्यानंतरही तीव्र व अतितीव्र स्वरूपातील कुपोषणग्रस्त बालकांची संख्या वाढली आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये शून्य ते ६ वर्षे वयोगटात २०१६-१७ मध्ये अतितीव्र ५९७, तर तीव्र २७३० कुपोषणग्रस्त बालकांची संख्या होती. २०२०-२१मध्ये ती वाढून अतितीव्र १५६९, तर तीव्र स्वरूपातील ९७०२ बालकांची संख्या झाली. कुपोषणाच्या उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणा कुठे कमी तर पडत नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
कुपोषणावर नियंत्रण आणण्यासाठी पोषण आहार व अमृत आहार योजना राबविली जात आहे. यात ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांसाठी कोरोनाचा पूर्वीपासून घरपोच आहार दिला जात होता, तर ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीमध्ये आहार शिजवून तो दिला जात होता; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच २० मार्च २०२०पासून या मुलांनासुद्धा घरपोच आहार देणे सुरू आहे. स्तनदा मातांनासुद्धा घरपोच आहार दिले जात आहे. तीव व अतितीव्र कुपोषणग्रस्त बालकांसाठी अमृत आहार योजना आहे. या अंतर्गत गर्भवती राहण्यापासून ते प्रसूतीनंतर बाळ ६ महिन्यांचे होईपर्यंत अंगणवाडीमध्ये दुपारच्यावेळी चौरस आहार दिला जात होता, तर दोन्ही प्रकारातील ६ महिन्यांपासून ते ६ वर्षांपर्यंत असलेल्या बालकांना आठवड्यातून चार दिवस केळी किंवा अंडी दिली जात होती; परंतु कोरोना काळात अंगणवाडी सेविकेमार्फत अन्न शिजवून थेट लाभार्थ्यांच्या घरी डबा पोहोचवून दिला जात आहे. असे असतानाही दोन्ही स्वरूपातील बालकांची संख्या वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
-कुपोषणग्रस्तांची संख्या कमी
पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा हे सहा जिल्हे मिळून २०१८-१९ मध्ये शून्य ते ६ वर्षांपर्यंतची ५९,९८४१ कुपोषणग्रस्त बालकांची नोंद झाली होती. २०१९-२०मध्ये ही संख्या वाढून ६०,०६६८ झाली; परंतु २०२०-२१मध्ये पुन्हा कमी होऊन ५७, ५७४२वर आली.
-अतितीव्रमध्ये ०.१ टक्का, तर तीव्रमध्ये १.४ टक्क्याने वाढ
पूर्व विदर्भात २०१८-१९ मध्ये अतितीव्र ११९८ (०.२ टक्के), तर तीव्र स्वरूपातील ६१६६ (१.० टक्के) बालकांची नोंद झाली. २०१९-२० मध्ये ती कमी होऊन अतितीव्र १४६४ (०.२ टक्के), तर तीव्र स्वरूपातील ५५८८ (०.९ टक्के) बालके आढळून आली. मात्र, २०२०-२१ मध्ये त्यात वाढ होऊन अतितीव्र स्वरूपातील १५६९ (०.३ टक्के), तर तीव्र स्वरूपातील ९७०२ (१.७ टक्के) बालकांची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अतितीव्र बालकांमध्ये ०.१ टक्का, तर तीव्र बालकांमध्ये १.४ टक्क्याने वाढ झाली.
- १०पट मृत्यूचा धोका अधिक
जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या निर्देशकांनुसार तीव्र आणि अतितीव्र कुपोषणग्रस्त असलेल्या शून्य ते ५ वयोगटातील बालकांना मृत्यूचा धोका १० पट अधिक असतो. यामुळे या बालकांकडे कोरोना काळातही विशेष लक्ष देणे आता गरजेचे झाले आहे.