नागपूर : कोरोनाची भयावह स्थिती आता नियंत्रणात आली आहे. पावसामुळे अनेक आरोग्य समस्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. अस्वच्छ पाणी व अन्नामुळे पावसाळी आजार वाढले आहेत. विशेषत: गॅस्ट्रो, विषमज्वर, अतिसार व ‘हेपेटायटिस ए’चे रुग्ण दिसून येत आहेत. उघड्यावरचे अशुद्ध पाणी व दूषित अन्न खाणे टाळले तर पावसाळ्यातही आजारापासून सुटका होणे शक्य असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
दूषित अन्न व पाण्यामुळे होतो गॅस्ट्रो
उघड्यावरचे दूषित अन्न खाल्ल्याने, पाणी न गाळता, न उकळता, तसेच न झाकलेले पाणी पिल्याने गॅस्ट्रोची लागण होण्याची शक्यता असते. मनपाच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोचे रोज २० ते ३० रुग्ण येत असल्याचे तेथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
-लक्षणे
पोट दुखणे व वारंवार पातळ संडास होणे, उलटी होणे, लहान मुलांची टाळू खोल जाणे, डोळे खोल जाणे, तोंड कोरडे पडणे वजनात घट होणे, लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे.
-उपाययोजना
पाणी उकळून व गाळून प्यावे. घराच्या परिसरातील स्वच्छता राखावी. शौचाला जाऊन आल्यानंतर हात साबणाने धुवावे. रुग्णाला जलसंजीवनी द्यावी. फरक न पडल्यास दवाखान्यात न्यावे.
माशा, दूषित पाण्यामुळे विषमज्वर
विषमज्वर (टायफॉइड) हा जिवाणूचा संसर्ग झाल्याने आलेला तापजन्य आजार आहे.
-लक्षणे
टायफॉइडची लक्षणे दिसण्यास दहा ते चौदा दिवस लागतात. अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा, वाटणे, डोकेदुखी, बारीक थंडी वाजून ताप येणे, मळमळणे, उलट्या होणे, मलावरोध, सांधेदुखी, पोटात मुरडा होणे, कळ लागणे, रक्तमिश्रित जुलाब होणे आदी लक्षणे आहेत.
-उपाययोजना
अन्नपदार्थ झाकून ठेवा. माशांना दूर ठेवा. पाणी उखळून व थंड करूनच प्या. पूर्ण शिजलेले व ताजे अन्नाचे सेवन करा. वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, वैयक्तिक आरोग्य आणि योग्य त्या वेळी टायफॉइडची घेतलेली लस यामुळे टायफॉइडला दूर ठेवता येते.
‘डायरिया’ प्रतिबंध करा
अतिसार (डायरिया) हे सहज प्रतिबंध करता येण्याजोगे आजार आहे. दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे हा आजार होतो.
-लक्षणे
पोटात ढवळणे, उलट्या होणे, जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. उलट्या, जुलाब यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो.
-उपाययोजना
या आजारात प्राथमिक उपचारामध्ये शुष्कता थांबविणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण पूर्ववत करण्यावर भर देणे आवश्यक असते. यासाठी ओ. आर. एस. (मौखिक जलसंजीवनी) युक्त पाणी दिले जाते. डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.
धोकादाय ठरू शकतो ‘हिपॅटायटिस ए’
‘हिपॅटायटिस ए’ म्हणजेच कावीळ हा रोग विषाणूमुळे प्रदूषित झालेल्या खाद्य पदार्थ किंवा शरबत किंवा पिण्याच्या पाण्याच्या सेवनातून होतो.
-लक्षणे
ताप, उलट्या, मळमळ, पिवळी लघवी ही सुरुवातीचे लक्षणे आहेत.
-उपाययोजना
फुटपाथवरील, हातठेल्यावरील खाद्यपदार्थ टाळणे फायद्याचे ठरते. सोबतच स्वच्छता राखणे आवश्यक असते. या रोगाला दूर ठेवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे.
-पावसाळ्यात हे खायला हवे
:: भाजलेला मखा
:: आल्याचा अथवा तुळस घातलेला चहा
:: ताज्या भाज्या, मोड असलेले कडधान्य
:: ब्रोकली, गाजर, मशरूम, टोमॅटो उकडून खावे
:: ड्रायफ्रूट्स, फळे
:: गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ओटस यापासून तयार केलेले पदार्थ
-हे पदार्थ टाळायला हवे
:: तळलेले व मीठ जास्त असलेले पदार्थ टाळायला हवे
:: रस्त्यावरील आंबवलेले पदार्थांपैकी इडली, डोसा
:: शिळे अन्न पदार्थ
-उघड्यावरचे पदार्थ टाळाच
पावसाळी आजारांना दूर ठेवायचे असल्यास उघड्यावरचे पदार्थ व पाणी टाळायलाच हवे. या मोसमात अनेक जण पाणीपुरी खातात. यातूनच अनेकांना गॅस्ट्रो व इतर आजार होत असल्याचे दिसून येते. आहारात घरचे ताजे अन्न घ्या. फिल्टरचे पाणी नसेल तर पाणी उकळून थंड करून प्या, बाहेर जात असल्यास घरचे पाणी सोबत बाळगा. ‘हिपॅटायटिस ए’ आणि ‘बी’ प्रतिबंधक लस टोचून घ्या.
-डॉ. अमोल समर्थ, गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट