नागपूर : २०२१-२२ च्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांच्या पसंतीमध्ये माेठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी ११ वीमध्ये प्रवेश करताना विज्ञान अभ्यासक्रमाला प्राधान्य हाेते पण नवीन सत्रात विद्यार्थी पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमाकडे धाव घेताना दिसत आहेत. यावर्षी पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमाचे प्रवेशफार्म भरणाऱ्यांची संख्या पाहता हेच चित्र दिसून येत आहे.
तांत्रिक शिक्षण संचालनालय (डीटीई) कडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विभागात पाॅलिटेक्नीक अभ्यासक्रमाच्या एकूण १२ हजार ३८४ जागा आहेत. नवीन सत्रात आतापर्यंत १० हजार ७६९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी फार्म भरला आहे. फार्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली पसंती शासकीय संस्थांना मिळत आहे. जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी शासकीय पाॅलिटेक्निक महाविद्यालयांना प्राधान्य दिले आहे. अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा वाढलेला कल पाहता यावेळी महाविद्यालयांच्या सर्व जागा भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत नागपूरच्या शासकीय पाॅलिटेक्निक काॅलेजच्या शिक्षकांना सांगितले, या सत्रात प्रचलित शाखांच्या अभ्यासक्रमासह विशेष काेर्सही सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये मेकाट्रॉनिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, ट्रॅव्हल्स ॲन्ड टूरिझम, टेक्सटाइल, पॅकेजिंग आदींचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांची सध्या इंडस्ट्रीमध्ये चांगली मागणी आहे आणि राेजगारांचे पर्याय अधिक आहेत. त्यामुळे विद्यार्थी या काैशल्य काेर्समध्ये रुची घेत आहेत.
कॅम्पस प्लेसमेंटमध्ये झाली वाढ
मागील काही वर्षात शासकीय आणि खाजगी पाॅलिटेक्नीक महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंटचा टक्का वाढला आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजचे राेजगार प्राप्त झाले आहेत. त्याचा परिणामही विद्यार्थ्यांवर झाला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थी आकर्षित हाेत आहेत.
शिक्षकांनी पाेहचविली अभ्यासक्रमांची माहिती
पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमाबाबत ग्रामीणच नाही तर शहरी विद्यार्थ्यांमध्येही माहितीचा अभाव हाेता. यामुळे विद्यार्थी या अभ्यासाकडे येत नव्हते. परिस्थिती पाहता शासकीय पाॅलिटेक्नीक महाविद्यालयांनी प्रयत्न केले. अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पाेहचविली. त्यामुळे विद्यार्थ्यांची आवड आणि कल वाढला आहे. त्यामुळे सर्व जागा भरण्याची आशा आहे.
- डॉ. मनोज डायगव्हाणे, विभागीय सहसंचालक, डीटीई
विभागात एकूण महाविद्यालयांची संख्या ४९
एकूण जागा १२३८४
फार्म आले १०७६९