योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आला असल्यामुळे सर्व विद्यापीठांमधील परीक्षा रखडल्या आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे ‘कॅम्पस प्लेसमेन्ट’ झाले आहे व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जुलै ते सप्टेंबरमध्ये ज्यांना रुजू व्हायचे होते, त्यांची चिंता जास्त वाढली आहे. तोपर्यंत परीक्षाच झाली नाही तर रुजू होता येईल का व आर्थिक संकटाच्या काळात कंपन्यादेखील प्लेसमेन्ट कायम ठेवतील का, असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर पडला आहे.सर्वसाधारणत: तिसऱ्या वर्षानंतर किंवा अंतिम वर्षाच्या पहिल्या सत्रात कॅम्पस प्लेसमेन्टच्या प्रक्रियेला सुरुवात होते. अभियांत्रिकी, व्यवस्थापन महाविद्यालयांत याचे प्रमाण जास्त असते. २०१९-२० या सत्रासाठी अनेक विद्यार्थ्यांना त्यातून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये थेट काम करण्याची संधीदेखील मिळाली होती. कंपन्यांच्या नियमांनुसार अंतिम सत्राची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. अनेक आयटी कंपन्यांकडून सर्वसाधारणत: सप्टेंबर-ऑक्टोबरच्या अगोदर विद्यार्थ्यांना रुजू करण्यात येते.कोरोनामुळे मार्च महिन्यातच लॉकडाऊन घोषित झाला व त्यानंतर परीक्षाच झालेल्या नाहीत. जर वेळेत परीक्षाच झाल्या नाहीत तर कंपन्या उशिरा रुजू होण्यासंदर्भात सूट देतील का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न पडला आहे. विद्यार्थ्यांसमोर पडलेला दुसरा मोठा प्रश्न हा तर थेट आर्थिक संकटाशी निगडित आहेत. बहुतांश कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशा स्थितीत वेळेत परीक्षा झाल्या व चांगले गुण मिळाले तरी कंपन्या आपल्याला रुजू करून घेतील का, ही चिंतादेखील त्यांना सतावते आहे.
कंपन्यांकडून सहकार्य मिळेलनामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेन्टची एक प्रक्रिया असते. त्यानुसार आमचे विद्यार्थी सर्वसाधारणत: जुलैमध्ये रुजू होतात. परंतु यंदा परीक्षाच झाल्या नसल्यामुळे वेळापत्रकात बदल करणे अनिवार्य आहे. आम्ही कंपन्यांना तसे कळविले असून विद्यार्थ्यांना काही आठवडे उशिरा रुजू होण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. कंपन्यांकडून सकारात्मक उत्तर येत आहे. आयटी कंपन्यांमध्ये काही प्रश्नच नाही. परंतु कोअर क्षेत्राशी निगडित कंपन्यांकडून अजून फारसे प्रतिसाद आलेले नाहीत. त्यांच्याकडूनदेखील निश्चित सहकार्य मिळेल अशी आशा आहे. आम्ही विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन सर्व स्थिती सांगितली आहे, असे व्हीएनआयटीचे सहयोगी अधिष्ठाता (ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेन्ट) डॉ.राहुल राळेगावकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरूविद्यार्थ्यांकडून निश्चितपणे प्लेसमेन्टबाबत विविध प्रश्न विचारण्यात येत आहेत. जोपर्यंत परीक्षांचे निकाल येत नाहीत, तोपर्यंत बहुतांश कंपन्या रुजू करून घेणार नाहीत ही बाब खरी आहे. परंतु जुलै महिन्यात सर्व परीक्षा होऊन ऑगस्टमध्ये निकाल लागतील अशी आशा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही, असे मत रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे अधिष्ठाता (प्लेसमेन्ट) डॉ. जयप्रकाश पालीवाल यांनी व्यक्त केले.