नागपूर : तापमान ४४ अंशापर्यंत पोहचले आहे. अंगाची काहिली वाढली आहे. उन्हाळ्याच्या आरोग्यावर लवकर परिणाम होतो. विशेषत: दूषित अन्न आणि पाण्यामुळे होणारा गॅस्ट्रो या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेच्या आयसोलेशन इस्पितळाच्या बाह्यरुग्ण विभागात जानेवारी ते २० एप्रिल २०१५ पर्यंत गॅस्ट्रोची लक्षणे असलेल्या १० हजार १८१ रुग्णांनी उपचार घेतला, तर आंतररुग्ण विभागात ३५ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले. सोमवारी दहावर रुग्णांनी उपचार घेतले. वाढती आकडेवारी पाहता काळजी घ्या, ग्रॅस्ट्रो पसरतोय, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.उन्हाळ्यात टायफॉईड, उष्माघात, गॅस्ट्रो हे आजार डोके वर काढतात. हे आजार टाळण्यासाठी स्वच्छ पाणी पिणे गरजेचे आहे. फळांची खरेदी करताना कापलेली फळे खाऊन बघू नयेत किंवा अशी फळे घेऊ नयेत. याचबरोबर आरोग्यवर्धक पदार्थांचे सेवन करणे आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. स्वच्छतेकडे लक्ष दिल्याने, हात नियमित धुतल्याने संक्र मणापासून दूर राहणे शक्य आहे. जे लोक रस्त्यांवर फार वेळ वाहनातून ये-जा करतात त्यांच्यासाठीही उन्हाळा धोकादायक ठरू शकतो. याशिवाय गर्भवती महिला, वृद्ध, मुले, कमी प्रतिकारशक्ती असणाऱ्या लोकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या वर्षी २० हजार रुग्णांवर उपचारआयसोलेशन इस्पितळाच्या बाह्यरुग्ण विभागात गेल्या वर्षी २० हजारावर रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर ४६५ रुग्णांना भरती करून उपचार करण्यात आले. यात मृत्यूची नोंद नाही. आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये लग्नातील जेवण दूषित असल्याची सर्वात जास्त कारणे समोर आली आहेत. याशिवाय रस्त्यावरील उघडे शीतपेय, दूषित अन्नाचे सेवन आदी कारणेही आहेत.
पारा वाढतोय, गॅस्ट्रो पसरतोय!
By admin | Published: April 21, 2015 1:57 AM