मुख्यमंत्री : संसदीय अभ्यासवर्गाचे उद््घाटननागपूर : लोकशाहीला अधिक मजबूत करण्यासाठी त्यात तरुणांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या ४४ व्या अभ्यासवर्गाचे उद््घाटन सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधान भवनात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, आमदार प्रा. मेघा कुळकर्णी, प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे व उल्हास पवार उपस्थित होते.समाजातील शेवटच्या घटकाचे हित साधण्याचे बहुमोल कार्य विधिमंडळात होते, संविधानाने राज्याच्या अखत्यारित दिलेल्या विविध विषयांसाठी कायदे तयार करणे तसेच राज्याचे वित्तीय व्यवस्थापन करणे हे विधिमंडळाचे कार्य असते. याशिवाय राज्यातील तातडीच्या समस्यांसंदर्भात चर्चा करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाते. विधिमंडळातील जास्तीत जास्त वेळ हा विधेयकावर चर्चा करण्यात जावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.तरुण पिढीने देशातील दुबळ्या घटकाच्या सक्षमीकरणासाठी योगदान द्यावे,असे आवाहन सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केले. तरुणांनी राज्यातील प्रमुख समस्यांवर लक्ष केंद्रित करून विकास कामात योगदान द्यावे, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन आमदार प्रा. मेघा कुळकर्णी यांनी केले. आभार उपसभापती वसंत डावखरे यांनी मानले. अभ्यासवर्गात राज्यातील ११ विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
लोकशाहीत तरुणांचा सहभाग वाढावा
By admin | Published: December 16, 2014 1:03 AM