नागपूर : डहाणू येथील वाढवण बंदर रद्द करण्याबाबत काही संघटनांच्या मागण्या होत आहेत. मात्र हे बंदर राज्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या बंदरामुळे महाराष्ट्रात दीड लाख कोटींची गुंतवणूक येईल. शिवाय यामुळे गुजरातचे बंदरक्षेत्रातील महत्त्व कमी होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. वाढवण बस्राला स्थानिक मच्छीमारांकडून होत असलेल्या विरोधाबाबत कपिल पाटील, सचिन अहिर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात ते बोलत होते.
वाढवण बंदर म्हणून विकसित करण्याबाबत केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणामार्फत हे विकसित होणार असून ते अत्याधुनिक बंदर राहणार आहे. तेथील एकाही मच्छिमारावर अन्याय होणार नाही. त्यांना योग्य मोबदला देण्यात येईल. तसेच विशेष योजना तयार करून त्यांना आधुनिक बोटीदेखील पुरविण्यात येतील. सरकारकडून मच्छिमारांशी चर्चा करण्यात येईल व त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासनदेखील फडणवीस यांनी दिले. राज्याला जितका समुद्रकिनारा लाभला आहे, त्या तुलनेत मच्छिमारीच्या व्यवसायात मागे आहे, असेदेखील ते म्हणाले