लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : येथील कोविड सेंटरमधील कार्यतत्पर कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना कार्यमुक्तीचे आदेश आणि कोविड सेंटर बंद करण्याच्या हालचालीवरून उमरेड परिसरात संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे. एकीकडे तालुक्याची आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनवर असताना कोविड सेंटर अचानकपणे बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात साेमवार (दि.१९) पासून उमरेड येथे उपविभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. एकीकडे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे उमरेड कोविड सेंटरमधील एकूण २२ जणांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले.
भाजप युवा मोर्चाचे जिल्हा मंत्री रोहित पारवे यांच्या नेतृत्वात आयोजित या आंदोलनास अनेकांचा पाठिंबा मिळाला. जोपर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक हा आदेश मागे घेणार नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचाही इशारा यावेळी देण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक, डॉ. निशांत नाईक, नायब तहसीलदार प्रदीप वरपे यांच्याकडे या समस्येबाबत निवेदन सोपविण्यात आले. यावेळी माजी आमदार सुधीर पारवे, नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया, उपाध्यक्ष गंगाधर फलके, दिलीप सोनटक्के, सतीश चौधरी, डॉ. मुकेश मुदगल, उमेश हटवार, बबलू लांडे, श्रीकृष्ण जुगनाके, धनंजय अग्निहोत्री, आदर्श पटले, अंजली कानफाडे, कपिल गायधने, राहुल किरपान, प्रदीप चिंदमवार, देवानंद गवळी, राहुल गायधने, तुषार ढोरे, कैलास ठाकरे, संजय चाचरकर, अमोल रायपूरकर, रुमित राहाटे, रोहित बक्सरे, लक्ष्मण मिरे, शुभम इनकने, जितू गिरसावळे, आकाश इनकने, नंदू मानकर, विशाल बेले आदींची उपस्थिती होती.
....
कार्यमुक्तीचे आदेश निघाले
एकीकडे कार्यमुक्ती आणि कोविड सेंटर बंद होत असल्याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन सुरू असतानाच, दुसरीकडे तालुका आरोग्य कार्यालयात कोविड सेंटरच्या कंत्राटी अधिकारी तथा कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्तीच्या आदेशावर कामकाज सुरू होते. प्रस्तुत प्रतिनिधीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली असता, १७ जुलै रोजी आम्ही कार्यमुक्तीचे आदेश दिले असून, सोमवारपासून एकूण २२ जणांना कार्यमुक्त केल्याची माहिती त्यांनी दिली. ....
परिचारिका आंदोलनात
कार्यमुक्तीचे आदेश संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळताच सर्वांनाच धक्का बसला. काही परिचारिकांनी आंदोलनस्थळ गाठले. या आंदोलनात त्यासुद्धा सहभागी झाल्या. आम्ही जीवाची बाजी लावत रात्रंदिवस एक करीत काम केले आहे. अशावेळी अचानकपणे आम्हास कामावरून काढून टाकण्यात आल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याची व्यथा अंजली वानखेडे, सुकेशनी पाटील, काजल दिवे, ज्ञानेश्वरी बळवाईक आदींनी व्यक्त केली.