लोकमत आॅनलाईननागपूर : ध्वजारोहण करणे, मानवंदना देणे, राष्ट्रगीत गायन करणे असे चित्र गणराज्य दिन वा स्वातंत्र्यदिनाला दिसते. मात्र शाळेला आर्थिक स्वरुपात किंवा वस्तूंच्या स्वरुपात देणगी देऊन स्वातंत्र्यदिन साजरा करणारेही एक गाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे गाव ही आगळी वेगळी परंपरा कसोशीने जपत आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगावासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेल्या केळी या गावाने ही अभिनव परंपरा निर्माण केली आहे.गावातील ग्रामपंचायत भवनात पारंपरिक पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केल्या जातो. त्यानंतर सर्व ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळेत जमतात. आधी औपचारिक पद्धतीने स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा होतो. त्यानंतर दातृत्वाचा सोहळा साजरा होतो. गावातील गरीब - श्रीमंत, आबालवृद्ध या सोहळ्यात हिरीरीने सहभागी होतात.५ रुपयांच्या पेनपासून १५ हजार रुपयांच्या वस्तू वा सुविधेपर्यंत देणगी देणारे दानशूर लोक या गावात आहेत. शाळेतील शिक्षक शाळेच्या गरजा ग्रामस्थांपुढे मांडतात व ग्रामस्थ त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आपला खिसा मोकळा करून देतात. त्यामुळे शाळा अंतर्बाह्य संपन्नतेच्या मार्गावर कूच करीत आहे.शाळादेखील दानशूरांचा सन्मान करण्यात मागे हटत नाही. प्रमुख अतिथींच्या हस्ते या दानशूर लोकांचा यथोचित सन्मान केला जातो. अशाप्रकारे आपणच आपल्या विकासाचे शिल्पकार अशी अभिनव परंपरा केळीच्या ग्रामस्थांनी व शाळेने निर्माण केली आहे. कालबाह्य परंपरा त्यागून काळाशी सुसंगत परंपरा निर्माण करणाऱ्या केळी या गावाची परिवर्तनशीलता अनुकरणीय अशीच आहे.माऊली सन्मान योजनाशाळेतील मुलींची संख्या कमी आहे. म्हणून नवजात मुलींच्या खात्यात ५ हजार रुपये जमा करणारी माऊली सन्मान योजना शिक्षक व ग्रामस्थ मिळून गेल्या वर्षी राबवली. आपल्या पदरचे ११ हजार रुपये खर्च करून रमेशराव सोनुने यांनी शाळेला साऊंड सिस्टिम भेट स्वरुपात उपलब्ध करून दिला. योगेश कोल्हाळ या तरुणाने ६ हजारांच्या खर्चातून पाण्याची टाकी व नळयोजना करून दिली. विजय घुगे या शिक्षकाने वर्गखोल्यात पंख्यांची व्यवस्था केली. विश्वनाथ घुगे यांनी कार्यालयात पंखे दिले.यावर्षीही दानात भर!यावर्षी राजेंद्र बळी यांनी ५ हजार रुपये खर्च करून युपीएस व होम थिएटर केळीच्या जिल्हा परिषद शाळेला दिले. शाळेत खिचडी शिजवणाऱ्या दाम्पत्याचे उच्चशिक्षित सुपुत्र अनिल देवराव केंद्रे यांनी १० हजार रुपयांचे वॉटर फिल्टर शाळेला दिले. तसेच सारंग केंद्रे यांनी शाळेला लोखंडी प्रवेशद्वार देण्याची घोषणा केली. तसेच गणेशराव घुगे यांनी १० हजार रुपयांचे प्रिंटर शाळेला देण्याचे अभिवचन दिले. भागवत हाटकर व गणेश महाजन यांनी ६ हजार रुपयांचे व्हाईटबोर्ड देऊन शाळा खडूमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. अशाप्रकारे गोर-गरीबांच्या लेकरांची ही जिल्हा परिषद शाळा सुविधांनी श्रीमंत करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.आम्ही धन्य जाहलो!ग्रामस्थ हे शाळेचे वारकरी झाले आहेत. ज्ञानमंदिरातून निघालेल्या या ग्रामस्थांच्या पालखीचे भोई होताना आम्हाला धन्यता वाटते.- प्रशांत बा. देशमुख, शरद अ. पाटील,शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, केळी
Independence day 2018; शाळेला देणग्या व गरजेच्या वस्तू देऊन होतो येथे स्वातंत्र्य दिन साजरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:49 AM
ध्वजारोहण करणे, मानवंदना देणे, राष्ट्रगीत गायन करणे असे चित्र गणराज्य दिन वा स्वातंत्र्यदिनाला दिसते. मात्र शाळेला आर्थिक स्वरुपात किंवा वस्तूंच्या स्वरुपात देणगी देऊन स्वातंत्र्यदिन साजरा करणारेही एक गाव आहे.
ठळक मुद्देअभिनव उपक्रमगोर-गरीबांची शाळा सुविधांनी होत आहे श्रीमंत