गोविंदराव देशपांडे, ज्येष्ठ नागरिक
- माझ्या कल्पनेत देशाच्या विकासाची आणि प्रगतीची संकल्पना काहीशी वेगळी आहे. हो देशाने माहिती तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती केली आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्याने तो जगाशी कनेक्ट झाला आहे. तंत्रज्ञानाने केलेली प्रगती नेत्रदीपक आहे. तरुणाईच्या प्रगतीच्या विकासाच्या व्याख्येत हीच प्रगती आहे. तंत्रज्ञानाची प्रगती म्हणजे विकास नाही. सामाजिक एकोपा, देशाभिमान, देशाचे संस्कार, कृतिशील विचारांची बांधणी तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या व्याख्येत नाही. माहिती तंत्रज्ञानाचं युग असतांनाही देशात वाढत्या बेरोजगारीचे भीषण संकट आहे. तरुणांचे भविष्याचे स्वप्न भंगले आहे. ग्रामीण भागात पोटापाण्याचे अजूनही भेडसावत आहे. देशाचा विकास तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा सर्व वर्गातील तरुणाईला आपले भविष्य सुकर दिसेल.
आकाश मुरलीधर टाले,
बी.एड. प्रथम वर्ष, सोनेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन.
- देशाचा अभिमान हा प्रत्येक नागरिकांनी बाळगायलाच हवा. स्वातंत्र्याची ही पंचाहत्तरी गाठत असताना, स्त्री ही नेतृत्वकर्ती झालेली बघायला मिळत आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखविली आहे. स्त्रिया आता गावगाडा सांभाळण्यापासून देश सांभाळायला लागल्या आहे. भारतात स्त्री शिकावी प्रगती करावी, यासाठी भरपूर प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे आधुनिक काळात स्त्री प्रत्येक क्षेत्रात स्पर्धक झाली आहे. अनेक क्षेत्रांतील पुरुषांच्या मक्तेदाऱ्या स्त्रियांनी मोडून काढल्या आहेत. हो, स्त्रियांच्या बाबतीत घडलेल्या काही घटना स्त्रियांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आहे. देशात स्त्रीला सुरक्षा आहे, म्हणूनच त्या कॉल सेंटरला, वैद्यकीय क्षेत्रात, हॉटेल व्यवसायात अशा अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कर्तव्य बजावत आहेत.
- विशाखा सुभाष गणोरकर, विद्यार्थीनी, बॅरिस्टर शेषराव वानखेडे कॉलेज