लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. सोमवारी दुपारपासूनच शहरातील प्रत्येक चौकात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय महत्त्वाच्या ठिकाणी आणि संवेदनशील परिसरात शस्त्रधारी पोलिसांचीही नेमणूक करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी नागरिकांना शुभेच्छा देतानाच सहकार्याचे आवाहन केले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रॅलींचे आयोजन केले जाते. रॅलीत डीजे लावून ध्वनिप्रदूषण केले जाते. अतिउत्साह दाखवला जातो आणि वाहतुकीत अडसर निर्माण करून नागरिकांना वेठीस धरले जाते. पोलीस आयुक्तांच्या लक्षात हा प्रकार पत्रकारांनी आणून दिला असता त्यांनी यंदा असे काही करणारांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडणाºयांवरही कारवाई केली जाईल. गेल्या वर्षी पोलिसांनी अशा ४०० जणांना नोटीस बजावले होते.
स्वातंत्र्य दिनाचा साजरा करण्याच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा आगाऊपणा केला जाऊ नये, म्हणून पोलीस खास दक्षता घेणार आहे. महिला मुलींच्या सुरक्षेसाठी गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची पथके नेमण्यात आली आहे. गर्दी आणि बाजाराच्या ठिकाणी महिला पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. दीक्षाभूमी, संघ मुख्यालय, गणेश टेकडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्टÑीय विमानतळ परिसर, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, मॉल, मल्टीप्लेक्स सिनेमागृहे, यासह अन्य धार्मिक स्थळीही पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, वॉचटॉवरच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे.सायबर सेलही सक्रियसायबर सेलही सक्रिय झाले आहे. फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्र, मेसेज टाकणाºयांवर लक्ष ठेवले जाणार आहे. सोमवारी रात्री ९ वाजतापासून वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर बंदोबस्तात उतरतील. संवेदनशील वस्त्यांवर विशेष लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी खास करून तरुणांनी स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात साजरा करावा. मात्र, कुणाच्याही भावना दुखावणार नाही, याची खास काळजी घ्यावी, असे आवाहनही पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी केले आहे.संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती दिसल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिस नियंत्रण कक्ष अथवा संबंधित पोलिस स्टेशनला माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम उपस्थित होते.आज मनपाची उद्याने सर्वांसाठी खुली१५ आॅगस्ट निमित्ताने मंगळवारी महापालिकेची सर्व उद्याने खुली राहणार आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. गांधीबाग, चिल्ड्रन ट्राफीक पार्कसह सर्व उद्याने पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुली राहतील, अशी माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाने दिली आहे.