नागपूर : थायरॉइडचे प्रमाण वाढत असले तरी हा असाध्य आजार नाही, त्याचे वेळीच निदान व त्यावर उपचार केल्यास निरोगी जीवन जगता येते. याच उद्देशाने मेयो, मेडिकलमध्ये मिशन थायरॉइड अभियानांतर्गत दर गुरुवारी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग (ओपडी) सुरू करण्यात आले आहे. याचा फायदा विशेषत: महिलांना होणार आहे.
फुलपाखराच्या आकाराची ‘थायरॉईड’ ग्रंथी आपली अंतस्त्रावी प्रणालीचा (अँडोक्रिम सिस्टम) एक महत्त्वपूर्ण अंग आहे. ही आपल्या मानेच्या समोर आणि कंठाच्या अगदी खाली असते. यातून निघणारे हार्मोन थायरोक्सिन (टी ४) आणि ट्रायओडोथायरोनिन (टी ३) शरीरातील प्रत्येक सेल ऊर्जेचा कसा वापर करतील हे निश्चित करते. याच प्रक्रियेला चयापचय क्रिया म्हटले जाते. जेव्हा थायरॉइड ग्रंथी खूप जास्त हार्माेन तयार करते तेव्हा त्याला ‘हायपो थायरॉइडीझम’ म्हटले जाते.
-साडेतीन लाख महिलांची तपासणी
मनपाच्या ‘माता सुरक्षित तर, घर सुरक्षित’ या अभियानांतर्गत ३ हजार ७४० महिलांची ‘थायरॉइड’ तपासणी करण्यात आली. यात ‘हायपो थायरॉइड’चे ६३४ तर ’हायपर थायरॉइड’चे ४४ रुग्ण आढळून आले.
-एकाच छताखाली सर्व तपासणी
मेडिकलमध्ये दर गुरुवारी थायरॉइडची स्वतंत्र ‘ओपीडी’ असणार आहे. या आजाराच्या रुग्णांना एकाच छताखाली सर्व तपासणी केली जाईल. ‘ओपीडी’चे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या हस्ते झाले. यावेळी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी, नोडल अधिकारी डॉ. देवेंद्र माहोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार, थायरॉइड ओपीडी प्रमुख डॉ. भाग्यश्री बोकारे आदी उपस्थित होते.
-१२.३० ते २ या वेळेत उपचार
मेयोमधील थायरॉइड ‘ओपीडी’चे उद्घाटन वैद्यकीय सहसंचालक डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राधा मुंजे, मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. दीप्ती चांद, नोडल अधिकारी डॉ. शोभना, ईएनटीचे विभागप्रमुख डॉ. जीवन वेदी, डॉ. कोवे. डॉ. माधुरी पांढरीपांडे डॉ. राखी जोशी, डॉ. मृणाल हरदास, डॉ. विपीन ईखार आदी उपस्थित होते. दर गुरुवारी ही ओपीडी दुपारी १२:३० ते २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
-ही लक्षणे दिसताच ‘ओपीडी’ गाठा
:‘हायपोथायरॉइड’ची लक्षणे : वजन वाढणे, चेहरा, पाय यांना सुज येणे, अशक्तपणा जाणवणे, आळस येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, जास्त थंडी वाजणे, पाळीमध्ये बदल होणे (महिलांसाठी), केस गळणे, गर्भधारणेमध्ये समस्या उदभवणे.
:‘हायपर-थायरॉइड’ची लक्षणे : हा प्रकार कमी रुग्णांमध्ये आढळून येतो. यात मासिक पाळीत बदल, बद्धकोष्टता, नैराश्य, त्वचा कोरडी होणे, थकवा, थंडी वाजणे, हृदयाचे ठोके कमी होणे, थायरॉइड ग्रंथीमध्ये सुज येणे, वजन वाढणे, खूप जास्त झोप येणे, पोटावर व जीभेमध्ये सुज येणे ही लक्षणे दिसून येतात.