इंडिया आघाडी, फेव्हिकॉल से भी नहीं जुडेगी, प्रफुल्ल पटेल यांचा टोला, PM मोदींची केली प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 07:51 AM2023-09-03T07:51:13+5:302023-09-03T07:51:22+5:30

अजित पवार गटाचा शनिवारी नागपुरातील देशपांडे सभागृहात संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला.

India Aghadi will not join Fevicol eitheR, Said that NCP Leader Praful Patel | इंडिया आघाडी, फेव्हिकॉल से भी नहीं जुडेगी, प्रफुल्ल पटेल यांचा टोला, PM मोदींची केली प्रशंसा

इंडिया आघाडी, फेव्हिकॉल से भी नहीं जुडेगी, प्रफुल्ल पटेल यांचा टोला, PM मोदींची केली प्रशंसा

googlenewsNext

नागपूर : विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत ‘जेथे शक्य असेल तेथे आघाडी करून लढू,’ असा ठराव घेण्यात आला. मात्र, यांना अनेक राज्यात एकमेकांविरोधात लढावेच लागेल. इंडिया आघाडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ‘जुडेंगे नहीं तो जितेंगे कैसे, ये तो फेव्हिकॉल से भी नहीं जुडेगी,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली.

अजित पवार गटाचा शनिवारी नागपुरातील देशपांडे सभागृहात संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्न व औषधी प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार राजेंद्र जैन, नाना पंचबुद्धे, आदी उपस्थित होते. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, इंडिया आघाडीच्या पाटण्यातील पहिल्या बैठकीला आपण होतो. या, बसा व जेवण करून जा, अशी ती बैठक होती. त्याच वेळी हे काही जुळणार नाही, हे आपल्या लक्षात आले होते.

आता मुंबईच्या तिसऱ्या बैठकीत ‘इंडिया’चा लोगो ठरविण्यासाठी एकमत होऊ शकले नाही, त्यामुळे लोगोचे लोकार्पण झाले नाही. यांचा समन्वयक ठरला नाही. शेवटी १३ लोकांची समिती करावी लागली.  दुसरीकडे, देशातील जनतेला विश्वास असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्यामुळे जगात देशाचा सन्मान वाढला आहे, अशी तुलनात्मक प्रशंसा पटेल यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवनकर, आभा पांडे, सतीश शिंदे, नरेश अरसडे, राजेश माटे, विश्वाल खांडेकर, आदी उपस्थित होते. 

आता भाजपसोबत गेलो, तर चूक काय?
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत बसायला तयार नव्हती. आम्ही काँग्रेसला समजावले. त्यावेळी सत्तेतून लोकांची कामे करण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत गेलो. मग आज त्याच उद्देशाने आम्ही भाजपसोबत गेलो तर काय चूक केली, असा सवालही पटेल यांनी केला. 

अजित पवारांवर आमदारांना विश्वास   
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास असल्यामुळेच ५३ पैकी ४३ आमदार सोबत आले आहेत. त्यांना त्यांचे भविष्य अजित पवारांकडे सुरक्षित वाटत आहे. ८ सप्टेंबरपर्यंत आयोगाकडे म्हणणे मांडायचे आहे. त्यानंतर १५ ते २० दिवसांत निकाल येईल. पक्ष व चिन्ह आपल्याकडेच राहतील, असा विश्वासही पटेल यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्रिपदाची संधी गमावली 
सन २००४ मध्ये काँग्रेसच्या ६९, तर राष्ट्रवादीच्या ७१ जागा निवडून आल्या. तरी मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिले. गेल्या निवडणुकीत ५६ आमदार असलेल्या शिवसेनेला पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देऊन ५४ आमदार राष्ट्रवादीला नंतरची अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देता आले असते; पण तसेही झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला दोनदा मुख्यमंत्रिपदाची संधी आली; पण ती गमावली. त्यामुळे राष्ट्रवादीची वाढ थांबली, असा ठपकाही पटेल यांनी ठेवला.

खचाखच गर्दी, उत्साह अन् संकल्प
आधीच राष्ट्रवादीची ताकद कमी असल्याने मेळावा यशस्वी होईल की नाही, अशी शंका घेतली जात होती; पण या मेळाव्यात कार्यकर्त्यांची खचाखच गर्दी होती. कार्यकर्ते उत्साहात घोषणा देत असल्याचे पाहून नेत्यांचा जोश वाढत होता. हा उत्साह पाहून प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना तिकीट देण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे स्पष्ट करीत विजयाचा संकल्प केला.

Web Title: India Aghadi will not join Fevicol eitheR, Said that NCP Leader Praful Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.