योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : गुरुवारी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड या एकदिवसीय सामन्याच्या तिकीटांचा काळाबाजार सुरू आहे. काही जण सोशल माध्यमांचादेखील यासाठी वापर करत आहेत. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय पागलखाना चौक परिसरातूनदेखील एका आरोपीला अव्वाच्या सव्वा दराने तिकीटे विकताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
सामन्याच्या ऑनलाईन तिकीट काही वेळातच संपल्यामुळे काहीही करून सामना प्रत्यक्ष पहायचाच या अट्टहासापोटी काळाबाजार करणाऱ्यांचे फावत आहेत. त्यामुळेच दुप्पटहून अधिक दराने क्रिकेट सामन्याच्या तिकिटांची काळ्याबाजारात विक्री होत आहे. सोशल मिडीयावरून हे प्रकार होत असल्याची बाब समोर आल्यावर पोलिसांनी फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.
नागपूर-वॉव या प्रोफाईलवर सामन्याची ८ हजारांची तिकीटे १२ हजाराला, ५ हजारांची १० हजाराला व ३ हजारांची ७ हजाराला उपलब्ध आहेत अशी पोस्ट होती. पोलिसांनी तांत्रिक तपास करून मोबाईलधारक अजहर सलीम शेख (७०५, विदर्भ कॉम्प्लेक्स, संगम टॉकीज चौक, सक्करदरा) याला लोकेशनच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याने ती प्रोफाईल त्याचा मित्र रोहीत गोपाल झोडे (२४, गरोबा मैदान, कापसे चौक) याची असल्याची सांगितले. त्याच्याकडे आणखी पाच तिकीटे असल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांनी अजहरच्या फोनवरूनच रोहीतला फोन लावून त्याला सक्करदरा चौकात बोलविले. तेथे सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून ३४ हजारांच्या तिकीटा जप्त केल्या. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हेशाखेने घेतले एकाला ताब्यात
दरम्यान गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाने मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पागलखाना चौक येथून राहुल दशरथ मोहाडीकर (३४, देशपांडे ले आऊट, त्रिमूर्तीनगर) या आरोपीला ताब्यात घेतले. खबऱ्यांच्या माध्यमातून तो तिकीटांचा काळाबाजार करत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ सहा तिकीट आढळले. त्याच्याविरोधात मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला तेथील पथकाच्या हवाली करण्यात आले.