मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्सनागपूर : आजचे खरे नेते ही आजची युवाशक्ती आहे. युवकांमध्ये बदल घडवून आणण्याची प्रचंड शक्ती आहे. आपल्या देशाला शांततेचा इतिहास लाभला आहे. अशा शांतताप्रिय युवकांचे सामर्थ्य असणाऱ्या युवा भारताला ‘सिक्युरीटी कौन्सिल’मध्ये (सुरक्षा परिषद) स्थान मिळायला हवे. यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. जैन इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स, नागपूर चॅप्टर या समारंभात ते शुक्रवारी बोलत होते.इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्सच्या भवितव्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपला देश हा शांतताप्रिय आहे. स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागो येथे बोलतांना आपल्या विचारसरणीने व संवाद कौशल्याने सर्वांची मने जिंकली होती. भारत हा सहिष्णू देश आहे. सर्वसुखी म्हणजे आपण सुखी असे मानणारी आपल्या देशाची संस्कृती आहे. सन २०२० या वर्षात जगात भारत फक्त तरुणांचा देश असणार आहे. त्यावेळी मार्गदर्शनाची भूमिका आपला देश बजावणार आहे. युनोमध्ये आपणांस कोणीही नाकारू शकणार नाही, असही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. यावेळी खासदार अजय संचेती, आमदार समीर मेघे, जैन इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक शांतीलाल बडजाते, अध्यक्ष अनुज बडजाते, विश्वस्त तुषार बडजाते, प्राचार्य अनमोल बडजाते, इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्सचे संस्थापक नैतिक शाह, अध्यक्ष रिषभ शाह तसेच नागपूर, वर्धा, राजनांदगाव, हैदराबाद, मुंबई येथून इयत्ता ८ वी ते १२ वी चे विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वादविवाद स्पर्धा तसेच बौद्धिक क्षमता विकसित करणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
‘सिक्युरिटी कौन्सिल’मध्ये भारताला स्थान मिळावे
By admin | Published: January 16, 2016 3:35 AM