नागपूर : माणसाला हाेणारे ८० टक्के आजार हे चुकीच्या खानपान शैली व चुकीच्या आहारामुळे हाेतात. मिलेट्स म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी अशा भरडधान्यांत पाेषक घटक प्रचंड प्रमाणात असतात. यावर्षी आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष साजरा करीत जगानेही पारंपरिक अन्नाचे महत्त्व जाणले आहे. मिलेट्सच्या रूपात पाेषण आहाराचा छुपा खजिनाच भारताकडे आहे, अशी माहिती भारतीय मिलेट्स संशाेधन संस्था (आयआयएमआर) चे प्रधान वैज्ञानिक डाॅ. राजेंद्र चापके यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष २०२३ अंतर्गत विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्राैद्याेगिकी संस्था (व्हीएनआयटी), कापूस विकास संचालनालय, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार व भारत टेक फाउंडेशन यांच्यावतीने व्हीएनआयटीमध्ये राष्ट्रीय मिलेट्स परिषदेचे आयाेजन करण्यात आले आहे. याप्रसंगी व्हीएनआयटीचे संचालक डाॅ. प्रमाेद पडाेळे, कापूस संचालनालयाचे संचालक डाॅ. ए. एल. वाघमारे, केमिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. सचिन मांडवगणे, शेतकरी समूह सातराचे अध्यक्ष विजय मुळे, न्यू सीड्सचे आर. के. मालवीय आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते.
डाॅ. चापके म्हणाले, पैसा सर्व काही नसताे. आराेग्य महत्त्वाचे आहे, हे काेराेनाने शिकविले. भरडधान्याचे उत्पादन कमी झाले आहे. किंमत वाढली आहे. त्यामुळे ६० ते ७० टक्के गरीब लाेकांच्या आहारात ते कसे येईल? मात्र उत्पादन वाढले, तर किमती घटतील आणि अत्यल्प दरात गरिबांना ‘पाेषण सुरक्षा’ मिळेल. आपण दरराेज दाेसा, पिझ्झा यासारखे फास्टफूड खाताे, ते या मिलेट्सद्वारे साेप्या पद्धतीने तयार करता येईल. तरुण पिढी आणि महिला यांच्यावर मिलेट्सच्या प्रचाराची जबाबदारी अवलंबून असून, दरराेज एकतरी भरडधान्य आहारात ठेवल्यास आराेग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत, असा विश्वास डाॅ. चापके यांनी व्यक्त केला. डाॅ. प्रमाेद पडाेळे यांनी, परदेशाचे अनुकरण करणारे भारतीय अमेरिकेकडून मान्यता मिळाल्यावर भरडधान्य खातील काय, असा उपराेधिक सवाल केला. मिलेट्सचे पारंपरिक ज्ञान व तंत्रज्ञान एकत्रित करून मिलेट्सच्या प्रक्रिया उद्याेगासाठी व्हीएनआयटी सहकार्य करण्यास तयार आहे, असा विश्वास त्यांनी दिला. संचालन डाॅ. ईप्शिता चक्रवर्ती यांनी व डाॅ. अनुपमा कुमार यांनी आभार मानले.
मिलेट्स प्रसाराची सप्तसूत्री : वाघमारे
डाॅ. ए. एल. वाघमारे यांनी मिलेट वर्षाअंतर्गत मिलेट प्रसारासाठी केंद्र सरकारने आखलेली सप्तसूत्री सांगितली. जगात ७३५ लाख हेक्टरमध्ये ८९१ लाख टन मिलेट्सचे उत्पादन हाेते व सर्वाधिक २० टक्के उत्पादन भारतात हाेते. भारतात १३८ लाख हेक्टरमध्ये १६३ लाख टन मिलेट्सचे उत्पादन हाेते, जे इतर खाद्यान्नाच्या ११ टक्के आहे. राजस्थानात सर्वाधिक २८ टक्के व महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९५० च्या तुलनेत क्षेत्र घटले असले, तरी उत्पादन मात्र तिप्पट वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताच्या शिफारशीवरून मिलेट वर्ष साजरे करण्याचे युनाेने मान्य केले. याअंतर्गत भविष्यात मिलेट्स जागरुकता, पाेषण आहार जागृती, मूल्यवर्धन, आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा, स्टार्ट-अप, उत्पादन व उत्पादन क्षेत्र वाढविणे व धाेरणात्मक निर्णय घेण्याची सप्तसूत्री आखल्याची माहिती डाॅ. वाघमारे यांनी दिली.