नागपूर : अमेरिकेत सध्या साेयाबीनचे दर ३६०० रुपयावर आहेत. भारत सरकारने साेयाबीनचे भाव ४,८९२ रुपये केले आहेत, जे जगात सर्वाधिक आहेत, असा दावा कृषी मूल्य आयाेग महाराष्ट्रचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला.
काॅंग्रेसचे नेत्यांचे प्रचारादरम्यान साेयाबीनला ७००० रुपये भाव देण्याचे आश्वासन खाेटे आहे, अशी टीका पाशा पटेल यांनी केली. महाराष्ट्रात आश्वासन देणाऱ्या काॅंग्रेसने त्यांचे सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये साेयाबीनला ७ हजार रुपये भाव का दिला नाही, असा सवाल पटेल यांनी केला. दरम्यान केंद्र सरकारच्या एमएसपीसह महाराष्ट्र सरकार साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५००० रुपये हेक्टरी अनुदान देखील देणार असल्याचे पटेल यांनी सांगितले.
यंदा साेयाबीन काढणीच्या वेळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले हाेते. साेयाबीनमध्ये ओलावा अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे १२ टक्के ओलाव्याची अट शिथील करण्याची मागणी आम्ही केंद्र सरकारला केली हाेती. ‘नाफेड’ने ही मागणी मान्य केली असून आता १५ टक्केपर्यंत ओलावा असलेली साेयाबीन सरकार खरेदी करेल, असे आश्वासन पटेल यांनी दिले.
भारत १६० लाख मेट्रिक टन खाद्यतेल आयात करताे. या आयातीवर अधिक शुल्क लावण्याची मागणी केली हाेती. त्यानुसार २० टक्के ड्युटी लावली. त्यामुळे तेलाचा भाव वाढला, पण साेयाबीनचा भाव वाढला नाही, अशी कबुली त्यांनी दिली. याबाबत अभ्यास केला असता भारतीय साेयाबीन पेंडचे दर अधिक असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी आहे. भारतीय पेंड ४३ रुपये तर अर्जेंटिना, ब्राझीलचे दर ३२ रुपये आहेत. ही स्थिती लक्षात घेता साेयाबीन पेंडसाठी केंद्र सरकारने १० टक्के निर्यात अनुदान द्यावे, अशी मागणी केली असल्याचे पाशा पटेल यांनी स्पष्ट केले.