नागपूर : केंद्र सरकारला देशाची सुरक्षा करायचीय. आम्हाला कुणाच्याही भूमीवर अतिक्रमण करायचे नाही. पण आपल्या लोकांचे रक्षण निश्चितच करायचे आहे. कुणीही यावे, दंगे करावे आणि निष्पाप लोकांना मारावे, असे चालणार नाही. भारत ही धर्मशाळा नाही, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. भारत रक्षा मंचतर्फे रेशीमबाग येथे आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान ते शुक्रवारी बोलत होते.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हेदेखील उपस्थित होते. सबका साथ सबका विकास हीच भारताची संस्कृती आहे. आपण कधीही भूतान व नेपाळच्या जमिनीवर डोळा ठेवला नाही. मात्र अंतर्गत सुरक्षेबाबत सजगता आवश्यक आहे. जगात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. मात्र सामर्थ्यवानाकडूनच शांतता व अहिंसा प्रस्थापित होऊ शकते, असे गडकरी म्हणाले. आमचे आयुर्वेद, योगविज्ञानाचा प्रचार जगभर झाला. मात्र आता लोक बदलले, देश बदलले, विज्ञान बदलले पण आपले धोरण व आदर्श बदललेले नाहीत. तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे नवीन पिढीसमोर कसे सादर करता येईल याचा विचार आम्हाला करावा लागेल, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.
माझ्या फिटनेसचे अमिताभ, जया बच्चनकडून कौतुक
काही वर्षांपूर्वी प्रकृतीच्या तक्रारी होत्या. आता मी दररोज एक तास प्राणायाम करतो. याचा फायदा झाला आहे. मी मागील महिन्यात अमिताभ व जया बच्चन यांना भेटलो. तुमची तब्येत कशी सुधारली, अशी विचारणा करत तुम्ही आता १० ते १५ वर्षे तरुण दिसत असल्याचे कौतुकोद्गार बच्चन दाम्पत्याने काढल्याचे गडकरींनी सांगितले. आज अनेक मुस्लीम राष्ट्रांमध्ये योग शिक्षकांची मागणी वाढली आहे. ते योग शिकण्यासाठी लाखो रुपये वेतन द्यायला तयार आहेत. आपण आपले ज्ञान चांगल्या तऱ्हेने सादरीकरण करायला शिकलो पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.