लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजच्या काळात जगाला शक्तीची भाषा कळते. जर आपण सशक्त असू तर अहिंसेचे तत्त्व जगासमोर मांडू शकू. त्यामुळेच आपण शस्त्रसंपन्न झालेच पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमादरम्यान जगविख्यात संगणकतज्ज्ञ डॉ.विजय भटकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे कार्याध्यक्ष शिरीष दामले, महासचिव डॉ.अजय कुळकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी म्हणायचे की हिंदू व भारतीय समाज शक्तिसंपन्न झाला पाहिजे. मात्र त्यांची भावना कळायला स्वातंत्र्यानंतर कितीतरी वर्षे लागली आहेत. जर सावरकरांचे बोलणे त्यावेळी गंभीरतेने घेतले गेले असले तर आज इतिहास बराच वेगळा राहिला असता. देश शक्तिसंपन्न झाला तर शत्रू वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. आपली शक्तीची साधना ही कुणाला घाबरविण्यासाठी नव्हे तर जगाचे कल्याण करणारी असावी. मात्र दुष्टांना धाक निर्माण करणारी हवी, असे प्रतिपादन डॉ. मोहन भागवत यांनी केले. सावरकर यांनी देशाला आपले आयुष्य अर्पण केले होते. मात्र त्यांच्या वाट्याला नेहमी तिरस्कार व अपमानच आला. सावरकर यांचे बोलणे तेव्हादेखील खरे होते व आजदेखील त्यात तितकीच सत्यता आहे. हळूहळू त्यांच्या विचारांकडे देश जातो आहे ही चांगली बाब आहे, असेदेखील ते म्हणाले. गुणवंत घटवाई यांनी यावेळी गीताचे सादरीकरण केले. डॉ. कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विवेक अलोणी यांनी संचालन केले तर मिलिंद कानडे यांनी आभार मानले.हिंदू धर्म कर्मकांडात बांधलेला नाहीसावरकर हे विज्ञाननिष्ठ हिंदू होते. हिंदू धर्मात मधल्या काळात काही अनिष्ट चालिरीती आल्या. परंतु हिंदू धर्म हा कुठल्याही कर्मकांडात बांधल्या गेलेला नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. भाषा, प्रांत, जात इत्यादी वाद सोडले पाहिजेत व सर्वांनी एकत्रित आले पाहिजे, असे मत डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले.वेद, प्राचीन ग्रंथांत विज्ञानाचे ज्ञानयावेळी डॉ.विजय भटकर यांनी वेद, पुराण, भागवतांमधील ज्ञानावर भाष्य केले. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अतिशय सखोल ज्ञान दडले आहे. भारतीय संस्कृती व विचार हे विज्ञानाधिष्ठितच आहेत. मात्र वैज्ञानिकांनी हवा तसा संस्कृती व ग्रंथांचा अभ्यासच केला नाही. वेदांमध्ये एखादी गोष्ट सांगितली आहे असे म्हटले की कुठलाही अभ्यास न करता त्याला नाकारणे व टीका करण्याची सुरुवात होते. अलिकडे तर हे प्रमाण वाढले आहे. मात्र वैज्ञानिकांनी सर्व शक्यता पडताळल्या पाहिजेत व अभ्यास करुनच बोलले पाहिजे. पाश्चात्त्यांना आपल्या प्राचीन ग्रंथातील ज्ञान पटले आहे, मात्र आपण विरोधच करतो ही दुर्दैवी बाब असल्याचे स्पष्ट मत डॉ.भटकर यांनी व्यक्त केले. गणितात तर भारताने मौलिक योगदान दिले आहे. संस्कृत भाषा तर संगणकाचा ‘प्रोग्राम’ लिहिण्यासाठी अतिशय योग्य आहे. खऱ्या अर्थाने भारत संगणकाचा आद्यप्रवर्तक आहे, असेदेखील ते म्हणाले.