सुब्बारायडू : राजस्व विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा समारोप नागपूर : या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अफगाण व भारत मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ झाले आहेत. भारत हा अफगाणिस्तानच्या पुनर्रचनेत व विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. क्षमतानिर्माणासाठी भारत सरकारने एक अरब डॉलरची तरतूद केली आहे, अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुब्बारायडू यांनी दिली. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर येथे दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या अफगाणिस्तानच्या राजस्व विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणाचा समारोप शुक्रवारी झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबईचे मुख्य आयकर आयुक्त विधू शेखर सिंघ, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे प्रधान संचालक रंगनाथ झा, अतिरिक्त महासंचालिका लीना श्रीवास्तव व नौशीत अंसारी प्रामुख्याने उपस्थित होत्या. सुब्बारायडू पुढे म्हणाले, भारत- अफगाणिस्तानच्या व्यापारविषयक संबंधाच्या दृष्टीने रोड-कनक्टेविटी महत्त्वाची असून चाबहार बंदराच्या माध्यमातून या क्षेत्रात चांगले परिणाम दिसून येतील. सलमा डॅमच्या साहाय्याने विद्युत निर्मिती व सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले असून सिंचन विकास व जलव्यवस्थापन यांना प्राधान्य दिले जात आहे. इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, काबूल येथे चिकित्सा केंद्राची स्थापना केली जात आहे. क्षमता निर्माण कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी एक हजार अफगाण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात असून ती पुढील पाच वर्षांपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. विधू शेखर सिंघ म्हणाले, राजस्व संकलन हे अर्थव्यवस्थेचा कणा असून राजस्व अधिकारी बजावत असलेली भूमिका ही लक्षणीय आहे. भारत अफगाणिस्तानला विविध क्षेत्रात मदत करत असून राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीने या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे दोनही देशाला कर-प्रशासनात दोघांसाठीही फायदेशीर ठरेल, अशी स्थिती निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अफगाणिस्तानच्या पुनर्रचनेत भारताची भूमिका महत्त्वाची
By admin | Published: February 25, 2017 2:09 AM