लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चीनच्या विविध भूमिकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वारंवार प्रहार करण्यात येतो. मात्र सरसंघचालकांनी चीनच्या ‘फार्मसी’ क्षेत्राबाबत नागपुरात कौतुकोद्गार काढले. प्राचीन काळापासून आपल्या देशाची औषधीशास्त्रात जगावर छाप आहे. मात्र आपल्या पारंपारिक औषधी ज्ञानावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. चीनने त्यांच्या परंपरागत ज्ञानाला आधुनिकतेशी जोडून त्यांच्या विशिष्ट औषधी तयार केल्या आहेत. त्यांनी स्वत:च्या बळावर हे उभे केले आहे. भारताकडे समृद्ध परंपरा असून भारतानेदेखील चीनच्या ‘फार्मसी’ क्षेत्रापासून शिकले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.मोहन भागवत यांनी केले. नागपुरात ते सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
चीनमध्ये पंरपरागत औषधोपचार आणि आधुनिक विज्ञान याची सांगड घालून एक वेगळी पद्धत निर्माण केली आहे. भारतीय फार्मसी क्षेत्राने चीन कडून हे आत्मसात करण्याची गरज आहे. फार्मसीचे क्षेत्र अतिशय चांगले असून या शास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीवर अवलंबून रहावे लागत नाही. फार्मसीच्या ज्ञानावर स्वतःचा रोजगार करता येतो. आम्ही आमच्या परंपरागत ज्ञानाची या विज्ञानाशी सांगड घालू शकतो का याचा विचार करण्याची गरज आहे. आपण परंपरागत ज्ञानाची आधुनिक फार्मसी शास्त्राशी सांगड घातली पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले.
भारतात प्राचीन काळापासून औषध आणि उपचारांचे ज्ञान परंपरेने चालत आले आहे. भारतीय कुटुंबात आजही हे ज्ञान बऱ्याच अंशी कायम आहे. त्यामुळेच कोरोना काळात काढा कसा बनवावा यासाठी आम्हाला फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत. सरकारने अनेक गरीब देशांना मोफत लसींचा पुरवठा केला. फार्मसीच्या शिक्षणातून अशी मानसिकता निर्माण झाली पाहिजे, असेदेखील ते म्हणाले.
औषध कंपन्यांच्या नैतिकतेवर सवालजगातील औषध कंपन्या नफा कमावण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधांचे उत्पादन करतात. जर एखाद्या देशात त्यांच्या औषधावर बंदी आली तर या कंपन्या प्रतिबंधन नसलेल्या इतर देशांमध्ये अशी औषधे विकतात. असे करणे योग्य आहे का, यावर विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.