निशांत वानखेडे
नागपूर : ‘विक्रम’ चंद्रावर यशस्वीपणे पोहोचल्यानंतर ‘इस्त्रो’चे ‘आदित्य एल-१’ शनिवारी सूर्याकडे झेपावले. सकाळी ११:५० मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून यान ‘आदित्य’ला घेऊन सूर्याकडे रवाना झाले. त्यानंतर मजल दरमजल करीत एक तास चार मिनिटांनी १२:५४ वाजता चौथ्या टप्प्यात त्याला पृथ्वीच्या कक्षेत स्थापन करून यान ‘आदित्य’पासून वेगळे झाले. इस्त्रोने केलेले या मोहिमेचे थेट प्रक्षेपण शनिवारी नागपूरच्या रमन विज्ञान केंद्र व तारामंडळात विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
केंद्राचे शिक्षणाधिकारी अभिमन्यू भेलावे यांनी या मोहिमेची सविस्तर माहिती लोकमतला दिली. यापुढे २३५ ते १९,५०० किलोमीटर अशा लंबवर्तुळाकार मार्गाने पृथ्वीच्या कक्षेत प्रदक्षिणा घालणार आहे. हळूहळू प्रदक्षिणेची कक्षा वाढत जाईल आणि आदित्यसोबत जोडलेले रॉकेट एक जोरदार धक्का देत आदित्यला या कक्षेबाहेर घेऊन जाईल. पुढे १२५ दिवसांचा प्रवास करीत हा उपग्रह सूर्याच्या ‘एल-१’ पॉइंटवर स्थापित करण्यात येईल. इथून तो सूर्याचे निरीक्षण करणार आहे. हे अंतर चंद्राच्या अंतरापेक्षा चारपट म्हणजे पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर आहे. पृथ्वी ते सूर्याचे अंतर जवळपास १५ कोटी किलोमीटर आहे, म्हणजे आदित्य या अंतराच्या केवळ एक टक्का अंतरावर असेल.
‘एल-१’ म्हणजे काय?
ईटालियन-फ्रेंच वंशाचे जोसेफ लुईस लॅगारेंज या गणितज्ज्ञाने ईस १७०० मध्ये आकडेमोड करून सूर्याच्या सभोवताली पाच बिंदू किंवा ठिकाण शोधून काढले होते. यालाच ‘लॅगारेंज पॉइंट’ असे म्हटले जाते. लॅगारेंज पॉइंट म्हणजे असे ठिकाण जेथे सूर्याची आणि पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती सारख्या प्रमाणात कार्य करते. यातील एका ‘एल-१’ पॉइंटवर आदित्य पोहोचेल. दोघांच्याही शक्तीने हे उपग्रह स्थिर राहील व स्थिर ठेवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जेची गरज पडणार नाही. या बिंदूवर निरीक्षणासाठी ग्रह, उपग्रह, दिवस, रात्र असे कुठलेही अडथळे येणार नाही व उपग्रह सातत्यपूर्ण निरीक्षण करेल.
सात उपकरणे, सात प्रकारचा अभ्यास
१) व्हिजिबल एमिशन लाइव्ह कोरोनोग्राफ (व्हीईएलसी) : सूर्याच्या शेवटच्या कोरोनो थरावरील दृश्य प्रकाश किरणांचा अभ्यास करेल.
२) सोलर अल्ट्राइमेजिंग टेलिस्कोप (स्कूप) : सूर्याच्या फोटोस्फियर व क्रोमोस्फियर थरातून निघणाऱ्या अतिनिल (अल्ट्राव्हॉयलेट) किरणांचे निरीक्षण.
३) सोलर लो-एनर्जी एक्स-रे स्पेक्ट्रोमिटर : सूर्यामधून निघणाऱ्या कमी ऊर्जेच्या क्ष-किरणांचे निरीक्षण.
४) सोलर हायर एनर्जी ऑर्बिटिंग एक्स-रे स्पेक्ट्रोमिटर : उच्च ऊर्जा असलेल्या क्ष-किरणांचे निरीक्षण.
५) आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सप्रिमेंट : सूर्यामध्ये सातत्याने होणाऱ्या सौरज्वाळांमधून ऊर्जा आणि वादळे बाहेर निघतात. त्यातून कोणते कण बाहेर पडतात, यावर अभ्यास.
६) प्लाझ्मा ॲनालायझर पॅकेज फॉर आदित्य (पापा) : इलेक्ट्रान व हेवियर ऑयनचे डिटेक्शन. सूर्यामध्ये केवळ हायड्रोजन व हेलियम हे दोनच अणू आहेत की त्याच्या प्लाझ्मामध्ये पृथ्वीप्रमाणे आणखी मूलद्रव्यांचे अणू, जड कण आहेत का, याचा अभ्यास.
७) ॲडव्हान्स ट्रायएक्सिएल हाय रिजॉल्यूशन डिजिटल मॅग्नेटोमिटर : सूर्याच्या चुंबकीय प्रणालीचा अभ्यास.
आपण अंतराळ मोहिमा राबवितो. उपग्रह, ऑब्जर्वेटरी किंवा मानव मोहिमांवर सूर्याच्या घडामोडींचा काय परिणाम होऊ शकतो? अशी परिस्थिती आली तर काय उपाय करता येतील? कधीकाळी सौरज्वाळा पृथ्वीच्या दिशेने आल्या तर बचावासाठी काय उपाय करता येईल, अशा गोष्टींच्या अभ्यासासाठी आदित्य झेपावला आहे.
- अभिमन्यू भेलावे, शिक्षणाधिकारी, रमन विज्ञान केंद्र