आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे. अर्थव्यवस्थेत भारताने इंग्लंडलाही मागे टाकले आहे. येत्या काळात कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीतून भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
युवक-युवतींमध्ये कौशल्य विकासाविषयी जनजागृती व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी सकाळी 'पीएम स्कील रन' ही दौड आयोजित करण्यात आली. दीक्षाभूमी परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकातून पीएम स्किल रनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते.
पीएम स्कील रन ही दौड आयटीआय मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली. यात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विकास बिसने, भारत शाहू आणि तेजस बनकर यांनी पुरुष गटात तर महिला गटात मोना सोमकुवर, निकीता शाहू आणि तृप्ती बावणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व व तृतीय स्थान पटकावले. या प्रसंगी अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे आयुक्त डॅा. रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे आदी उपस्थित होते. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार आयुक्त डॅा. रामास्वामी एन. यांनी मानले.