नागपूर : भारत हा विश्वगुरू होता, तो केवळ आपल्या अध्यात्माच्या ताकदीवरच. आजच्या काळात खऱ्या अर्थाने अध्यात्माची गरज आहे. त्यामुळे देशाला पुन्हा एकदा आपल्या अध्यात्माची ताकद निर्माण करावी लागेल. या अध्यात्माच्या ताकदीवरच भारत देश पुन्हा एकदा विश्वगुरू होईल, जगाचे मार्गदर्शन करेल, असा विश्वास अजमेर शरीफ दर्गाचे गद्दीनशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. (India will become a world leader again only on the strength of spirituality; Syed Salman Chishti Ajmer Sharif)
लोकमततर्फे आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेसाठी ते नागपुरात आले असता लोकमतशी चर्चा करीत होते. हाजी सय्यद सलमान चिश्ती यांचे कुटुंबीय गेल्या ८०० वर्षांपासून अजमेर शरीफ दर्गाची सेवा करीत आहेत. सध्या सेवा करणारी त्यांची पिढी ही २६ वी आहे. गेल्या ८०० वर्षांपासून अजमेर शरीफ येथे दररोज हजारो लोकांना लंगर सेवा पुरवली जाते. यात सर्वधर्मीयांचा समावेश असल्याने शुद्ध शाकाहारी जेवण तयार केले जाते. कोविडकाळातही लोकांची मोठ्या प्रमाणावर सेवा करण्यात आली. यासोबतच आरोग्य व शिक्षणाच्या क्षेत्रातही काम केले जाते.
यावेळी हाजी सय्यद सलमान चिश्ती म्हणाले, आजवर मी अनेक धार्मिक परिषदा पाहिल्या. त्यात सहभागीसुद्धा झालो. परंतु, देशातील एक प्रमुख मीडिया हाउस असलेल्या लोकमतने आयोजित केलेली ही आंतरधर्मीय परिषद अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण, आज अशा परिषदांची खऱ्या अर्थाने गरज आहे. तेव्हा इतर मीडिया हाउसेसनेही यातून शिकण्याची गरज आहे.