नागपूर : एकेकाळी माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, पी. व्ही. नरसिंह राव यांच्यासारख्या व्हीव्हीआयपींच्या उड्डाणासाठी वापरण्यात येणारे एमआय-८ च्या ताफ्यामधील एक हेलिकॉप्टर नागपुरातील फुटाळ्यावर स्थापन करण्यात आले आहे. फुटाळा सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत सार्वजनिक प्रदर्शनाचा भाग म्हणून भारतीय वायुदलाचे प्रताप नावाने प्रसिद्ध हे हेलिकॉप्टर बुधवारी ठेवण्यात आले.
हे हेलिकॉप्टर वायुसेनानगर एअरफोर्स स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते. तेथून ते महामेट्रोला देण्यात आले व बुधवारी सकाळी तलावाच्या काठी आणण्यात आले. आठ फुटाच्या प्लॅटफॉर्मवर हे हेलिकॉप्टर बसविण्यात आले आहे. एमआय-८ हे हेलिकॉप्टर २०२० पर्यंत भारतीय वायुदलाच्या सेवेत होते. तत्कालीन सोव्हिएत युनियनमध्ये ते तयार करण्यात आले होते. व्हीव्हीआयपी उड्डाणांसाठी त्याचा उपयोग करण्यात आला. विशेषत: राष्ट्रपती, पंतप्रधानांचे उड्डाण याच ताफ्यातील हेलिकॉप्टर्समधून व्हायचे. भारतीय वायुदलाकडे एकूण १०७ एमआय-८ हेलिकॉप्टर्स होती. प्रताप या नावानेदेखील ते ओळखल्या जायचे.
शौर्यगाथेतदेखील सहभागी
वायुदलाच्या विविध ऑपरेशन्समध्येदेखील या ताफ्यातील हेलिकॉप्टर्स सहभागी झाले होते. विशेषत: सियाचेन ग्लेशिअर्समधील ऑपरेशन मेघदूत व श्रीलंकेतील ऑपरेशन पवनमध्ये या हेलिकॉप्टर्सने मौलिक कामगिरी बजावली होती. पूर तसेच अनेक आपत्कालिन परिस्थितींमध्ये वायुदलाने यांच्या सहाय्याने मदतकार्यदेखील राबविले होते.
दोन हेलिकॉप्टर्स सार्वजनिक जागी
बहुउद्देशीय असलेल्या या हेलिकॉप्टर्समध्ये प्रवाशांसह चार टन माल वाहून नेण्याची क्षमता आहे. भारतीय वायुदलाने या हेलिकॉप्टरला व्हीआयपी सलूनमध्ये रूपांतरित केले व त्यात शौचालयाची सुविधादेखील आहे. भारतीय वायुदलाने एमआय-८ च्या ताफ्यामधील दोन हेलिकॉप्टर्स सार्वजनिक जागी ठेवण्यासाठी दिली आहेत. यात नागपूरसह चंदीगडचादेखील समावेश आहे. या हेलिकॉप्टर्सचा वापर एअरबोर्न कमांड पोस्ट, सशस्त्र गनशिप म्हणूनदेखील केला गेला. हे जगातील सर्वाधिक उत्पादित हेलिकॉप्टरपैकी एक असून, ५० हून अधिक देश याचा वापर करत आहेत.