नागपूर : भारतातील दंत चिकित्सकांचा अनुभव व कौशल्य पाहता युरोपातील देशांसह अरब देशांमध्येही मोठी ‘क्रेझ’ आहे. एकीकडे पाश्चात्य देशात मोठ्या हुद्द्यांवर डॉक्टर काम करीत आहे तर, दुसरीकडे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून भारतात गावखेड्यापासून ते दुर्गम भागात दंत चिकित्सक आपली सेवा देत आहेत, असे प्रतिपादन भारतीय दंत संघटनेचे (आयडीए) नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. वैभव कारेमोरे यांनी येथे केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनाच्या (आयएमए) सभागृहात रविवारी ‘आयडीए’चा पदग्रहण सोहळा थाटात पार पडला. यावेळी डॉ. कारेमोरे यांनी अध्यक्षपदाची, डॉ. पुनम हुडीया यांनी सचिव पदाची तर डॉ. विवेक ठोंबरे यांनी कोषाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर दयाशंकर तिवारी, डॉ. रामरेड्डी येल्टीवार उपस्थित होते. कोरोना काळात दंत चिकित्सकांनी मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल महापौर तिवारी यांनी कौतुक केले. डॉ. कारेमोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वर्षभरातील शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. ‘निडकॉन-२०२२’ची घोषणाही त्यांनी केली. संचालन डॉ. रिचा सुगंध यांनी केले तर आभार डॉ. हुडीया यांनी मानले.