लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तो आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा, आपल्या बचावकौशल्याने भल्याभल्यांचे ‘गोल’ रोखणारा, प्रसंगी ‘हॉकी स्टीक’च्या प्रहाराची तमा न बाळगता देशासाठी अडथळे, जखमांची पर्वा न करता खेळणारा. परंतु वडिलांच्या आयुष्याच्या बचावाची वेळ आली तेव्हा मात्र त्याच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला तो आर्थिक आधाराचा. परंतु खेळाडूंची समर्पण भावना जाणणाऱ्या नागपुरातील एका वैद्यकीय तज्ज्ञाने या खेळाडूला केवळ आधारच दिला नाही, तर त्याच्या वडिलांच्या जीवावरील संकटदेखील दूर केले. भारतीय हॉकी संघाचा ‘गोलकीपर’ आकाश चिकटे याच्यावरील मोठे संकट दूर करुन शहरातील ‘न्यूरोसर्जन’ डॉ. प्रमोद गिरी यांनी एक आदर्श उदाहरणच सादर केले आहे.आकाश चिकटे हा मूळचा यवतमाळजवळील लोहारा या गावचा असून त्याचे वडील अनिल हे ‘वेल्डिंग’चे काम करतात. त्यांना ‘अॅन्युरिस्म’ नावाच्या मेंदूच्या आजाराने ग्रासले. त्यांना तातडीने उपचारांची आवश्यकता होती व त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित होता. बुधवारी याची माहिती मिळाली तेव्हा आकाश पुण्याला होता. यवतमाळमधील इस्पितळातील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्याच्या वडिलांना नागपुरात आणण्यात आले. आकाश हा आंतरराष्ट्रीय खेळाडू असल्याचे कळताच डॉ. प्रमोद गिरी यांनी स्वत: पुढाकार घेतला व चिकटे कुटुंबीयांना आधार दिला. आर्थिक तंगीत असलेल्या आकाशसमोर पैसे कुठून उभे करावे, असा प्रश्न होता. मात्र डॉ.गिरी यांनी यातदेखील त्याच्या डोक्यावरील तणाव दूर केला व शस्त्रक्रिया मोफत करण्याचे ठरविले. डॉ.गिरी यांनी यशस्वीपणे त्याच्या वडिलांवर शस्त्रक्रिया केली व ते आता धोक्याबाहेर आहेत. त्यांच्यावर डॉ. गिरी हे स्वत: जातीने लक्ष ठेवून आहेत.आकाशने देशाला गौरव प्राप्त करून दिला आहे. २०१६ मधील आशिया चषक स्पर्धेतील विजेत्या संघाचा तो सदस्य होता व विशेष म्हणजे त्याला ‘गोलकीपर आॅफ द टू़र्नमेन्ट’ हा पुरस्कारदेखील मिळाला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय सैन्यातदेखील आहे. खेळाडूंचा सन्मान करणे आपली जबाबदारीच आहे व याच भावनेतून मी उपचार केले, असे मत डॉ.प्रमोद गिरी यांनी व्यक्त केले. डॉ.गिरी यांच्या मदतीची फेड करणे शक्यच नाही. संकटाच्या वेळी ते देव म्हणून धावून आले. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी माझ्या खेळावर आणखी मेहनत करेन व देशाला आणखी गौरव प्राप्त करुन देईल, अशी भावना आकाश चिकटे याने व्यक्त केली.
भारतीय संघातील ‘गोलकीपर’च्या वडिलांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 8:46 PM
भारतीय हॉकी संघाचा ‘गोलकीपर’ आकाश चिकटे याच्यावरील मोठे संकट दूर करुन शहरातील ‘न्यूरोसर्जन’ डॉ. प्रमोद गिरी यांनी एक आदर्श उदाहरणच सादर केले आहे.
ठळक मुद्देडॉ. प्रमोद गिरी यांनी दिला अडचणीच्या वेळी आधार : आकाश चिकटेच्या कुटुंबीयांसाठी ठरले ‘देवदूत’