नागपूर : लाचखोरीच्या प्रकरणात हव्या असलेल्या इंडियन ऑइल कार्पोरेशनचा महाव्यवस्थापक एन. पी. रोडगे यास सीबीआयने सोमवारी अटक केली. रोडगेला ताब्यात घेण्यासाठी सीबीआयला मेहनत घ्यावी लागली. तीन दिवसांपासून फरार रोडगेची चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील महत्त्वाची माहिती पुढे येऊ शकते.
सीबीआयने २५ मार्चला नागपूर आणि गोंदियात कारवाई करून लाचखोरीचे दोन गुन्हे दाखल केले होते. नागपुरात मुख्य व्यवस्थापक (रिटेल सेल्स) मनीष नांदळेला पेट्रोल पंपाचा मालकी हक्क ट्रान्सफर करण्याच्या प्रकरणात एक लाख रुपये घेताना पकडण्यात आले. तक्रारकर्ता अशोक चौधरीकडून रोडगेने लाच मागितली होती. रोडगेने आपण बाहेर असल्याचे सांगून नांदळेला पैसे देण्यास सांगितले. नांदळे भेटल्यानंतर रोडगेचा शोध घेतला असता तो चंद्रपुरात असल्याची माहिती मिळाली. सीबीआयच्या हाती लागण्यापूर्वी तो फरार झाला. त्यानंतर त्याचा शोध घेणे सुरू करण्यात आले.
सोमवारी सकाळी अकरा वाजता रोडगेने सीबीआयच्या विशेष न्यायालयात शरणागती पत्करली. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे निर्देश दिले. त्याची माहिती मिळताच सीबीआयचे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी रोडगे या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगून ताब्यात देण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत रोडगेला सीबीआय कोठडीत पाठविले. नांदळे मंगळवारपर्यंत सीबीआयच्या ताब्यात असून, त्याची कोठडी वाढविण्याची विनंती करण्यात येणार आहे.
गोंदियातील कारवाईत अटक केलेला सेल्स ऑफिसर सुनील गोलार न्यायालयीन कोठडीत आहे. रोडगे २०१८ मध्ये नागपुरात आला होता. सूत्रांनुसार कोणताही अधिकारी तीन वर्षांपेक्षा अधिक एका ठिकाणी राहू शकत नाही. तरीसुद्धा रोडगे नागपुरात तळ ठोकून होता. नांदळेलाही तीन वर्षांपेक्षा अधिक काळ नागपुरात झाला आहे. रोडगे नागपुरात प्रमुख असतानाही त्याच्या वतीने सर्व काम नांदळे सांभाळत होता. त्यांचा एक साथीदारही यात सहभागी आहे. हे त्रिकुट ‘आयओसी’त वसुलीचे काम करते. या त्रिकुटाशिवाय आयओसीत पानही हलत नसल्याचे सांगण्यात येत आहे. तिसरा अधिकारी तपासात सीबीआयच्या पुढे येऊ शकतो. सीबीआयला रोडगेच्या तीन लॉकरची चावी मिळाली आहे.
सोमवारी ते लॉकर उघडण्याची शक्यता होती; परंतु सीबीआयचे अधिकारी न्यायालय आणि तपासाशी निगडित दुसऱ्या कामात व्यस्त असल्यामुळे लॉकर उघडू शकले नाहीत. सीबीआयचे अधीक्षक एम. एस. खान यांच्या नेतृत्वात हा तपास सुरू आहे. खान यांनी या प्रकरणाशी निगडित कोणतीही माहिती असल्यास सीबीआयशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
.................