लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिमेंटचे रस्ते निर्मिती प्रक्रियेमध्ये रस्ते बंद करावे लागतात. शिवाय रस्तेनिर्मिती ही वेळखाऊ आणि खर्चिक प्रक्रिया आहे. मात्र, आता सिमेंट रस्त्यांसाठी आवश्यक असलेले स्ट्रक्चर आता प्रीकास्ट करून म्हणजे बाहेर साच्यांमध्ये बनवून रस्ते निर्मितीच्या स्थळी आणता येईल व तेथे ते ब्लॉक जोडून कमी वेळेत आणि कमी त्रासात सिमेंटचे रस्ते तयार करता येईल.या तंत्रज्ञानावर आधारीत शोधपत्र व्हीएनआयटी येथील पीएच.डी.चे विद्यार्थी अमीन सय्यद यांनी आयआरसीच्या तात्रिक सत्रामध्ये सादर केला. या तंत्रज्ञानाला ‘कन्स्ट्रक्शन आॅफ प्री-स्ट्रेसड काँक्रिट पेव्हमेंट’ असे नाव आहे. यावेळी अमीन यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे या तंत्रज्ञानाचा विस्तार सांगितला. रस्ते निर्मिती करताना अनेक दिवस लागतात. गुणवत्ता राखण्यासाठी सतत ओलावा देत राहणे आवश्यक आहे. ओलाव्याच्या अभावामुळे सिमेंट रस्त्यांची गुणवत्ता ढासळते. मात्र, या तंत्रज्ञानाने या सर्व समस्यांवर मात करून उच्च गुणवत्ता असलेले रस्ते निर्मिती करता येईल. याशिवाय आयआयटी आणि एनआयटीमधील विद्यार्थ्यांनी यावेळी आपले शोधपत्र सादर केले.आयआरसीच्या पहिल्या दिवशी तब्बल चार तांत्रिक सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रांमध्ये तब्बल ३२ तांत्रिक शोधपत्रांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये संशोधक, बांधकाम व्यवसायिक यांनीही शोधपत्रांचे सादरीकरण केले.