शांताक्का यांचे प्रतिपादन : राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी महोत्सव साजरानागपूर : आपल्या देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती आहे. परंतु युद्धाच्या प्रसंगी प्रत्यक्ष रणभूमीवर लढण्यासाठी सगळेच तयार होतील असे नाही. ‘इस्रायल’मध्ये सामान्य नागरिकदेखील सैनिक प्रशिक्षण घेतात व राष्ट्रावर संकट आले असता देशाच्या संरक्षणासाठी उभे होतात. भारतीयांदेखील ‘इस्रायल’च्या नागरिकांच्या राष्ट्रसमर्पण भावनेचे अनुकरण केले पाहिजे, असे मत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले. राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी व शस्त्रपूजन सोहळा रविवारी सायंकाळी संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. नागरिकांनी पहिले प्राधान्य देशालाच दिले पाहिजे. यासाठी लहानपणापासूनच तसे संस्कार देणे आवश्यक आहे. प्रत्येकाने जागरुक नागरिक झाले पाहिजे व यात महिलांची मोठी भूमिका आहे. त्यामुळे महिलांमध्ये जागृती आणायला हवी, असे शांताक्का म्हणाल्या. आपल्या देशात सणांची परंपरा आहे. प्रत्येक सण हा मौलिक संदेश देत असतो व खऱ्या अर्थाने हे सण सकारात्मक वातावरण निर्मिती करतात, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले. ्नराष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमीच्या सोहळ्याला नागपुरातील निरनिराळ्या शाखांमधील सेविकांची उपस्थिती होती. शाळकरी मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यतचा समावेश असलेल्या सेविकांच्या पथकाने योगासने, घोष, लेझिम यांची निरनिराळी प्रात्यक्षिके सादर केली. त्याचबरोबर सेविकांनी दाखविलेल्या खड्गाच्या प्रात्यक्षिकांनी तर उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडले. या कार्यक्रमाला समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे, महानगर कार्यवाहिका करुणा साठे या उपस्थित होत्या. या सोहळ्याचे ‘युट्यूब’ तसेच वेबकास्टिंगच्या माध्यमातून जगभरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. (प्रतिनिधी)मराठा आंदोलनावर अप्रत्यक्ष टीकादेशात विविध जातपंथामध्ये दुरावा दिसून येत आहे. विविध जाती विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. परंतु यामुळे समाजाचे विघटन होत आहे. यासाठीच सामाजिक समरसतेची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी त्यांनी कुठल्याही समाजाचे नाव घेतले नाही. परंतु सध्याची सामाजिक व राजकीय स्थिती लक्षात घेता त्यांचा रोख अप्रत्यक्षपणे मराठा आंदोलनाकडेच होता.
भारतीयांनी ‘इस्रायल’चे अनुकरण करावे
By admin | Published: October 03, 2016 2:43 AM