आंबेडकर जयंती महोत्सव : वेदप्रकाश मिश्रा यांचे प्रतिपादननागपूर : जगाचे कोणतेही संविधान माणसाच्या जीवन उत्थानाची व विकासाची हमी देत नाही. पण भारताचे एकमेव संविधान असे आहे की, हे मानवी विकास आणि उन्नतीची हमी देते. भारताचे संविधान यामुळेच जगात सर्वात उच्च स्थानावर मानल्या जाते, असे प्रतिपादन विचारवंत डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत प्रा. देवीदास घोडेस्वार होते. डॉ. वेदप्रकाश मिश्रा भारताच्या प्रास्ताविकेच्या संदर्भात आपले मत अभिव्यक्त करताना म्हणाले, या प्रास्ताविकेची सुरुवात ‘आम्ही भारताचे लोक’अशी होते. म्हणजेच सर्वांच्या हिताचे रक्षण, स्वरक्षण व प्रगती सर्व मिळून करण्याची संकल्पना यात प्रामुख्याने दिसते. भारताचे भविष्य व वर्तमान कोणी घडविणार असेल तर ते भारताचे लोक आहेत म्हणून हे संविधान भारतातील लोकांना पूर्णपणे समर्पित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही प्रास्ताविका म्हणजे ‘गागर मे सागर भरने की कला’ होय असे ते म्हणाले. भारताच्या संविधानात दोन हजार वर्षाच्या क्रांतीचे प्रतीक पाहायल मिळते. विविधतेच्या देशात एकता प्रास्तावित करून ठेवणारे जगातील एकमेव संविधान भारताचे आहे. बुद्धकालीन व अशोककालीन शासन व्यवस्थेची झलक भारताच्या प्रास्ताविकेत पहायला मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रा. देवीदास घोडेस्वार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, संविधानाच्या कलम २५ व २६ नुसार प्रत्येक धर्माला आपआपला प्रचार प्रसाराची मुभा आहे. परंतु ही असताना धर्मपरिवर्तनाच्या अधिकाराला आज आळा घालण्याचे प्रयत्न चालू आहे. ६५ वर्षाच्या काळात भटक्यांच्या जीवनातील परिवर्तन पाहिल्यास आपल्याला संविधानाने घडवून आणलेले परिवर्तन दिसेल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भंदत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सचिव सदानंद फुलझेले, सदस्य व्ही.टी. चिकाटे, विलास गजघाटे, प्राचार्य पी.सी. पवार, संचालक डॉ. मालती रेड्डी, डॉ. प्रकाश खरात आदी उपस्थित होते. प्रा. संध्या कलमधड यांनी संचालन केले. प्रा. मनोज अंड्रसकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
भारताचे संविधान हाच जीवन मार्ग
By admin | Published: February 29, 2016 3:11 AM