निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संरक्षण यंत्रणा व तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन बलवान असल्याचे बोलले जात असले तरी भारतही काही कमी नाही. सैन्य कमी असले तरी आपणही मिसाईल, विमान व अण्वस्त्रांबाबत सक्षम आहोत. याशिवाय सियाचीन, लडाखचा भाग खडतर असला तरी परिस्थिती भारतासाठी अनुकूल आहे. कमी उंचीवरून विमाने उडवताना अधिक दारूगोळा नेता येतो, याउलट उंचावर असलेल्या चिनी सैन्याला ते अडचणीचे आहे. त्यामुळे आपली यंत्रणा अधिक सुस्थितीत असल्याचा विश्वास निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला. कर्नल पटवर्धन हे १९७५-७६ या काळात कॅप्टन म्हणून सियाचीन भागात तैनात होते. सियाचीनकडे जाणारे बेस शोधताना त्यांच्या टीमने या भागात पॅट्रोलिंग केली. सध्या भारत आणि चीनमध्ये तणाव सुरू आहे. कर्नल पटवर्धन यांनी लोकमतशी बोलताना या भागातील परिस्थितीची माहिती दिली. पूर्व हिमालयाच्या पेंगाँग सरोवरातून गलवान नदी निघते व ती पुढे लेह, काश्मीरमार्गे सिंधू नदीला जाऊन मिळते. गलवान खोऱ्याने काराकोरम पर्वताच्या खिंडीतून कजाकिस्तान, अफगाणिस्तान व इराणमार्गे युरोपकडे जाणारा मार्ग निघतो.विशेष म्हणजे चीनचा २७ देशांमधून जाणारा बॉर्डर रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) हा अति महत्त्वाकांक्षी प्रकल्प या काराकोरम खिंडीतूनच पाकिस्तानकडे जातो. त्यामुळेच चीनची धडपड सुरू आहे. त्यांनी जर या भागावर कब्जा केला तर भारतासाठी अडचणीचे होईल, म्हणून त्यांना दूर ठेवणे हा आपला प्रयत्न आहे. ६ जूनला गलवान खोºयात ड्रॅगनच्या हालचालीमुळे तणाव झाला. त्यानंतर सेनाधिकाऱ्यांमध्ये बोलणी झाली पण १५ जूनला ही धुमश्चक्री झाली. रात्री ११ पासून पहाटे ४ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंच्या ४००-५०० सैन्यात संघर्ष झाला. यात निश्चितच चिनी सैन्याचे नुकसान अधिक झाले आहे. सध्या परराष्ट्र मंत्रालय व लष्करी अधिकारी स्तरावर चर्चा सुरू आहे पण जमिनीवर सैनिकांना कारवाईची मुभा दिली आहे, ही बाब अतिशय समाधानकारक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.शरीर गोठविणारी थंडीगलवान नदीचे पात्र ५ ते ६ फूट खोल असेल; पण नदीचा वेग अधिक आहे. या खोऱ्यात १० महिने थंडी असते आणि दोनच महिने वातावरण साफ असते. मात्र जीवघेणी थंडी असते. येथील तापमान शून्य अंशाच्या खाली असते आणि या शरीर गोठविणाऱ्या थंडीत आपले जवान सीमेवर तैनात राहून शौर्याने लढत असतात. अशा कठीण परिस्थितीतही आपले सैनिक ड्रॅगनच्या कुरापतींशी लढण्यास सक्षम आहेत.
हा भारताचा जुना व्यापारी मार्गपेनोंग लेकमधून निघणारे गलवान नदीचे खोरे १५० ते २०० फुटाचे आहे आणि दोन्ही बाजूला उत्तुंग टेकड्या आहेत. जुन्या काळी हाच इतर देशांचा व्यापारी मार्ग होता. व्यापारी गलवान खोऱ्यातून येत पुढे लेह व काश्मीर मार्गे दिल्लीकडे जायचे. याच मार्गाने भारतावर आक्रमणही करण्यात आले आहे. दौलतबेग ओलडी हा मार्गाचा थांबा होता. विशेष म्हणजे नागपूर येथील एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी याच खडतर बेसवर लढाऊ विमान यशस्वीपणे उतरविले होते.