योगेश पांडे
नागपूर : फार्मसी उद्योगात भारताची प्रगती होत असतानाच वैद्यकीय उपकरणांची बाजारपेठदेखील वाढत आहे. सद्यस्थितीत भारतात वैद्यकीय उपकरणांत २५ अब्ज डॉलर्सची उलाढाल होते. २०२५ पर्यंत हाच आकडा ५० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल व २०३० पर्यंत भारत या क्षेत्रात पहिल्या पाच देशांमध्ये असेल, असे प्रतिपादन ‘एआयएमईडी’ (असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइस इंटस्ट्री)चे समन्वयक राजीव नाथ यांनी दिली. ‘इंडियन फार्मस्युटिकल सायन्स’साठी नागपुरात आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
मागील अनेक दशके विविध कारणांमुळे संधी असूनदेखील आपला देश या क्षेत्रात मागे राहिला. जगभरातील वैद्यकीय उपकरणांची बाजारपेठ ६५० अब्ज डॉलर्सची असून पुढील तीन वर्षांत ती ७५० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल. यातील अमेरिकेचा वाटाच एक तृतीयांश इतका आहे. युरोपमध्ये दीडशे अब्ज डॉलर्सच्या उपकरणांची मागणी असते तर लॅटिन अमेरिकेत ६५ अब्ज डॉलर्स व अरब राष्ट्रांत ३० अब्ज डॉलर्सची बाजारपेठ आहे. त्या तुलनेत जास्त लोकसंख्या असूनदेखील भारतातील उलाढाल ही फारच कमी आहे. मात्र, भविष्यात यात निश्चित वाढ होईल. भारतातील वैद्यकीय उपकरणांचे सामान, कच्चा माल इत्यादींच्या आयातीचे प्रमाण ८० टक्के आहे. त्यातील एक तृतीयांश म्हणजेच २० हजार कोटी रुपयांची आयात अमेरिका व चीनमधूनच होते. हे प्रमाण कमी करण्याची आवश्यकता आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
फार्मसी- वैद्यकीय उपकरणांचे क्षेत्र वेगळे
सरकारी यंत्रणेपासून ते अगदी जनसामान्यांमध्ये वैद्यकीय उपकरणांचे क्षेत्र हे फार्मसीच्या अंतर्गतच येत असल्याचा समज आहे. मात्र, दोन्ही क्षेत्र वेगवेगळे आहेत. दुर्दैवाने वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्राला फार्मसीचेच कायदे लागू पडतात. त्यामुळे उत्पादकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो, असे राजीव नाथ यांनी सांगितले.
‘बोगस’ उत्पादकांपासून सावध राहा
वैद्यकीय उपकरणांमध्येदेखील अनेक जण मोठ्या नावांचा दावा करत बोगस उत्पादनांची विक्री करतात. हे लोग अमेरिकन एफडीएचे बनावट लोगो किंवा आयएसओ मार्क्सचा उपयोग करतात. भारताला वैद्यकीय उपकरणांसंदर्भात राष्ट्रीय धोरण तयार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राजीव नाथ यांनी केले.
या वस्तूंच्या निर्यातीत भारत पहिल्या पाचमध्ये
- सिरिंजेस, नीडल्स, आयव्ही, ब्लेड, कॉन्ट्रासेप्टिव्ह्ज, लेन्सेस, स्टेन्ट्स.