नागपूर : संपूर्ण देशातील लाेक मंगळवारी धुळवडीचा आनंद घेत असताना भारतीय अंतराळ संशाेधन संस्था-इस्राेने दमदार कामगिरी करीत जगाचे लक्ष वेधले. इस्राेच्या वैज्ञानिकांनी पृथ्वीच्या कक्षेतील ‘मेघा ट्राॅपिक्स-१’ या कालबाह्य झालेल्या उपग्रहाला सुरक्षित आणि नियंत्रितपणे प्रशांत महासागरात पाडले. अंतराळात फिरत असलेला मृत उपग्रहांचा कचरा दूर करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
उष्णकटिबंधीय हवामान आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी इस्राेने फ्रेंच अंतराळ संशाेधन संस्था सीएनईसीच्या सहकार्याने ‘मेघा ट्राॅपिक्स-१’ हे उपग्रह १२ ऑक्टाेबर २०११ राेजी पृथ्वीच्या कमी कक्षेत यशस्वीपणे धाडले हाेते. हे उपग्रह तीन वर्षांच्या मर्यादित कालावधीसाठी प्रक्षेपित केले हाेते. मात्र, उपग्रहाने २०२१ पर्यंत यशस्वीपणे कार्य बजावले. त्यानंतर कालबाह्य झालेले हे उपग्रह पाडण्यासाठी इस्राेची २०२२ पासून प्रक्रिया सुरू केली हाेती. युनायटेड नेशन्स इंटर-एजेन्सी स्पेस ड्रब्रीस काे-आर्डिनेशन कमिटीने याबाबत वेळ आणि काळ निर्धारित करून उपग्रह पाडण्याची परवानगी दिली. विशेष म्हणजे, १०२१ किलाे वजनाच्या या उपग्रहामध्ये १२५ किलाे इंधन असल्याने पाडताना धाेका हाेण्याची भीती व्यक्त केली जात हाेती. शिवाय पृथ्वीच्या वातावरणात येताच ते भरकटण्याची शक्यताही हाेती. चिनी उपग्रह अनेकदा कक्षेबाहेर जाऊन पृथ्वीच्या वातावरणात पडल्याच्या अनेक घटना आपल्याला माहिती आहेत. गेल्याच वर्षी चंद्रपूरकरांनी याचा अनुभव घेतला आहे. मात्र, इस्राेच्या वैज्ञानिकांनी काैशल्य पणाला लावून उपग्रह नियंत्रितपणे प्रशांत महासागरात पाडले.
तज्ज्ञांच्या मते अनेक देशांनी हजाराे उपग्रह मागील ५० वर्षांपासून अंतराळात पाठविले असून कालबाह्य झालेल्या उपग्रहांच्या लाखाे सुट्या भागांचा कचरा अंतराळात सैरभैर फिरत आहे. यातील काही कमी कक्षेत, मध्यम कक्षेत आणि उच्च कक्षेत आहेत. हे उपग्रह कधी कधी भरकटत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने खाली पडतात. हे सुटे भाग खाली पडताना माेठा विमान अपघात हाेण्याची भीती वाढली आहे. शिवाय कधी मानवी यान अंतराळात पाठविताना अंतराळात फिरणाऱ्या या कचऱ्यामुळे माेठा अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इस्राेची ही कामगिरी महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे.