लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण राज्यात वृक्ष लागवडीचे ३८.३९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. पावसाच्या विलंबामुळे मोहीम प्रभावित झाली असून ही परिस्थिती अशीच राहिल्यास वृक्ष लागवड मोहिमेचा कालावधी वाढविला जाऊ शकतो, असे संकेत प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) साईप्रकाश यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.राज्यात अपुऱ्या पावसामुळे या मोहिमेमध्ये वृक्ष लागवडीचा वेग मंदावल्याचे कारण सांगितले जात आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या मोहिमेतील प्रगतीचा आढावा बुधवारी मुंबईत घेणार आहेत. या मोहिमेमध्ये समाविष्ट असलेल्या ५८ विविध एजन्सींच्या कामाचा आढावा ते या बैठकीत घेणार आहेत. मोहिमेतील उद्दिष्टाशिवाय २० टक्के अतिरिक्त रोपट्यांची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस नसल्याने मोहीम तूर्तास थांबविली आहे. अन्य ठिकाणीही अशी परिस्थिती उद्भवल्यास निर्णय घेतला जाऊ शकतो, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश यांनी सांगितले.वनभवनामध्ये झालेल्या पत्रकारपरिषदेला प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) साईप्रकाश यांच्यासह प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन, व्यवस्थापन) प्रवीण श्रीवास्तव आणि नागपूर सामाजिक वनिकरण विभागाचे वनसंरक्षक अशोक गिºहीपुंजे उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या स्थानावरवनविभागाने जालना, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये ९९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याचा दावा साईप्रकाश यांनी केला. सामाजिक वनीकरण विभागातही सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असून ८८ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. पालघर आणि धुळे जिल्ह्याने ८५टक्के, तर ठाणे जिल्ह्याने ७९ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. सर्व एजन्सी मिळून जुलै महिन्याच्या तिसºया आठवड्याअखेर सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या स्थानावर आहे. या जिल्ह्याने मोहिमेमध्ये ७५ टक्के उद्दिष्ट साधले असून त्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्हा ७१ टक्के, ठाणे जिल्हा ७० टक्के रत्नागिरी जिल्हा ६४ टक्के तर गडचिरोली जिल्ह्याने ६० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.
टँकरने पाणी पुरवठ्यावरून अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमलागवड केलेली रोपटी पाण्याअभावी सुकत असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता साईप्रकाश म्हणाले, अद्यापही जमिनीत ओलावा असल्याने अशी स्थिती दिसल्याचा अहवाल नाही. तसेच टँकरने रोपट्यांना पाणी घालण्याची तरतूदही नाही. मिहान प्रकल्प क्षेत्रातील रोपटी सुकल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर, रोपट्यांना जगविण्यासाठी नागपूर सामाजिक वनिकरण विभागाने दोन टँकरची व्यवस्था केल्याचे सामाजिक वनिकरण विभागाचे वनसंरक्षक अशोक गिºहीपुंजे यांनी सांगितले. यामुळे टँकरने रोपट्यांना पाणी देण्याच्या मुद्यावर अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये दिसले. यानंतर मात्र अधिकाऱ्यांनी सावरासावर केली. नांदेडमधूनही या संदर्भात मागणी आली असून आकस्मिक खर्चातून अशी व्यवस्था करण्याची तरतूद असल्याचे प्रवीण श्रीवास्तव यांनी सांगितले.