नागपूर : नागपूरहुन लखनौला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने विमान नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आले. विमान सुखरूप उतरल्याने सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या विमानात ५० प्रवाशांसह ४ क्रू मेंबर्स होते, ते सर्व सुरक्षित असल्याचे एअरलाइनकडून सांगण्यात आले आहे.
माहितीनुसार, सोमवारी इंडिगोचे हे विमान नागपूरहुन लखनौकडे निघाले होते. दरम्यान, काही तांत्रिक बिघाडामुळे विमानातून धूर निघण्यास सुरुवात झाली, ही बाब लक्षात येताच वैमानिकाने विमानाला नागपूर विमानतळावर लँड केले. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. या विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. तसेच, इंजिनिअरिंग टीमकडून विमानातील बिघाडाचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, शनिवारीही रांचीमधे इंडिगो विमानात बिघाडाची घटना समोर आली होती. यानंतर, रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर कोलकाताला जाणारी फ्लाइट रद्द करण्यात आली. तर, आज पुन्हा इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाडाची घटना समोर आली आहे.