नागपूर : अनलॉकमध्ये नागपुरातून विमान आणि प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. याअंतर्गत मंगळवारपासून इंडिगो एअरलाईन्सची नागपूर-कोल्हापूर विमानसेवा अहमदाबादमार्गे सुरू झाली आहे. पहिल्या विमानाचे उड्डाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मंगळवारी झाले.
नागपूर-कोल्हापूर सेवेंतर्गत इंडिगोच्या विमानाचे दुपारी ४.२५ वाजता उड्डाण झाले. यामुळे नागपुरातून कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची मागणी पूर्ण झाली आहे. नागपुरातून तीन दिवस उड्डाण भरणारे हे विमान नागपुरातून अहमदाबादमार्गे कोल्हापूरला मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी उड्डाण करणार आहे. हे विमान कोल्हापूरला पोहोचल्यानंतर परत अहमदाबादमार्गे नागपुरात येणार आहे. या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याची प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी होती.
सूत्रांनी सांगितले की, नागपुरातून कोल्हापूरकरिता ही सेवा पहिल्यांदा सुरू झाली आहे. सध्या नागपूर विमानतळावर विमानांच्या उड्डाणांची संख्या वाढली आहे. दोन महिन्यांपूर्वी नागपूर विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानांची संख्या तीन वा चार होती. स्थिती सामान्य होऊ लागताच विमानांची संख्या वाढली. सध्या १७ ते १८ विमाने दररोज उड्डाण करीत आहेत. सध्या नागपुरातून दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, पुणे आणि बेंगळुरू येथे उड्डाणे होत आहेत.