नागपूर : कोविड काळात विमानसेवा आणि प्रवासी संख्येत घसरण झाली होती; पण आता केंद्र सरकारतर्फे विमान कंपन्यांना काही सवलती देऊ केल्यानंतर उड्डयन क्षेत्राचे पंख विस्तारले आहेत. याच शृंखलेत इंडिगो विमान कंपनी नागपुरातून लखनौ आणि चेन्नईकरिता ३१ ऑक्टोबरपासून विमान सेवा सुरू करीत आहे. (IndiGo's flights from Nagpur to Lucknow, Chennai, Goa)
रविवार, ३१ ऑक्टोबरला लखनौचे विमान नागपुरातून सकाळी ११.१० वाजता रवाना होऊन दुपारी १ वाजता पोहोचले आणि लखनौ येथून दुपारी १.२५ वाजता रवाना होऊन नागपुरात दुपारी ३.१५ वाजता पोहोचणार आहे, तर सोमवार ते शनिवारपर्यंत हेच विमान दुपारी ३.४५ वाजता रवाना होऊन लखनौला ५.४० वाजता पोहोचेल आणि हेच विमान ६.१० वाजता लखनौ येथून उड्डाण भरून ८ वाजता नागपुरात पोहोचणार आहे.
चेन्नईकरिता नागपुरातून विमान सायंकाळी ५.३० वाजता निघून ७.२० वाजता पोहोचेल आणि चेन्नई येथून दुसरे विमान सकाळी १०.५५ वाजता रवाना होऊन नागपुरात १२.३५ वाजता पोहोचणार आहे. चेन्नईकरिता नागपुरातून आधीही नियमित विमान सेवा सुरू होती; पण कोविड लॉकडाऊनमुळे ही सेवा बंद झाली; पण आता हे उड्डाण दुसऱ्यांदा सुरू झाल्याने प्रवाशांना सुविधा मिळाली आहे. इंडिगोने लखनौकरिता आधीही विमान सेवा सुरू केली होती, पण काही दिवसांनंतर उड्डाण बंद केले होते. सध्या नागपुरातून २० विमानांचे उड्डाण आणि तेवढ्याच विमानांचे लँडिंग होत आहे.
यादरम्यान गोव्याकरिता बंद असलेली विमान सेवा इंडिगोने पुन्हा सुरू केली आहे. विमान कंपनीतर्फे पूर्वीही गोवा विमानाला शेड्यूलमध्ये समाविष्ट केले होते. सध्या कोरोनानंतर पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली असून, त्यांच्याकडून विचारणा करण्यात येत आहे. त्यामुळे कंपनीने या मार्गावर विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.