भदंत रेन दा : पाच दिवसीय बुद्ध महोत्सवाचे थाटात उद्घाटन नागपूर : भगवान बुद्धाने सांगितलेला धम्म भारतातून जगात गेला. आमचा चीन हा देश १३०० वर्षांपासून धम्माचा प्रचार करीत आहे. भारताचेही यात मोठे योगदान आहे. ही निश्चितच अभिनंदनीय गोष्ट आहे, असे विचार दीक्षाभूमी येथे आयोजित बुद्ध महोत्सवाचे उद्घाटक शांगडोन, चीन येथून आलेले भदंत रेन दा यांनी व्यक्त केले. या पाच दिवसीय बुद्ध महोत्सवाचे बुधवारी थाटात उद्घाटन झाले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मचारी ऋतायुश, नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागलोकचे अध्यक्ष धम्मचारी लोकमित्र, प्रसिद्ध लेखक-अभिनेता तिगमांशू धुलिया, भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई उपस्थित होते. याप्रसंगी रेन दा यांनी स्वत:च्या हाताने साकारलेले भगवान बुद्धाच्या नावाचे चित्र प्रसिद्ध केले. धम्मचारी लोकमित्र विचार व्यक्त करताना म्हणाले, दीक्षाभूमीसारख्या पवित्र ठिकाणी बोलणे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. बुद्धाच्या काळात कलेला फार महत्त्व होते. परंतु नंतर कलेचा सातत्याने ऱ्हास होत गेला. आता बुद्धाचे अनुयायी पुन्हा कलेला तिचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताहेत ही आंनदाची गोष्ट आहे. त्यासाठी अशा महोत्सवाचे निरंतर आयोजन व्हायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनीही विचार व्यक्त केले. धम्मचारी ऋतायुष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय बुद्ध फिल्म फेस्टिव्हल आणि कला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध जनजागृतीपर व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.(प्रतिनिधी) चीनमधून ८३ कलावंत स्वखर्चाने आले कॅलिग्राफी व ‘चान टी म्यूझिकल’ शोच्या माध्यमातून धम्माचा प्रचार व प्रसार करणारे चीनमधील ८३ कलावंत स्वखर्चाने या महोत्सवात आले आहेत. धम्माच्या या प्रचार यात्रेत त्यांना आलेले अनुभव भारतीय तरुणाईसोबत वाटता यावे, हा त्यांचा प्रयत्न आहे. याशिवाय त्यांच्याअंगी असलेल्या कलागुणांचे आदान-प्रदानही त्यांना करायचे आहे. पुढचे पाच दिवस हे सर्व कलावंत नागपुरात मुक्कामी राहणार आहेत.
इंडो-चायनाचा संयुक्त धम्मप्रसार अभिनंदनीय
By admin | Published: February 23, 2017 2:01 AM