आशिष देशमुखांवर कारवाईचे संकेत, हांडोरेंची चौकशी समिती येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:07 PM2021-09-27T16:07:18+5:302021-09-27T16:18:02+5:30
भाजप उमेदवाराच्या प्रचार करीत केल्याप्रकरणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाकडे तक्रार केली आहे. याची गंभीर दखल घेत, या प्रकरणाच्या चौकशीसाठी काँग्रेसचे नागपूर विभाग प्रभारी माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे दोन दिवसांत नागपुरात दाखल होणार आहेत.
नागपूर :काँग्रेसचे प्रदेश महासचिव माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर पक्षातर्फे कारवाई करण्याचे संकेत मिळाले आहेत. काटोल तालुक्यातील सावरगांव येथे भाजप उमेदवाराच्या प्रचार करीत केल्याप्रकरणी देशमुख यांची स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाकडे तक्रार केली आहे. याची गंभीर दखल घेत, या प्रकरणाच्या चौकशीसाठी काँग्रेसचे नागपूर विभाग प्रभारी माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे दोन दिवसांत नागपुरात दाखल होणार आहेत. चौकशीत देशमुख दोषी आढळले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
जि.प. पोटनिवडणुकीत सावरगाव सर्कलमधून पार्वताबाई काळबांडे या भाजपच्या उमेदवार रिंगणात आहेत. काळबांडे यांच्या निवासस्थानी २५ सप्टेंबर रोजी बैठक व छोटेखानी सभा झाली. या बैठकीत आशिष देशमुख उपस्थित होते. त्यांच्यासह भाजपचे उकेश चव्हाण व इतर पदाधिकारीही होते. या बैठकीचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले. काँग्रेसचे विभागीय बुथ समन्वयक प्रकास वसु यांनी प्रदेश प्रभारी, प्रदेशाध्यक्ष व शिस्तपालन समितीकडे तक्रार करीत देशमुख यांच्यावर कारवाईची मागणी केली.
पटोले यांच्या कार्यकारिणीत नुकतेच आशिष देशमुख यांना सरचिटणीस म्हणून स्थान देण्यात आले आहे. यानंतरही ते भाजप उमेदवाराचा उघड प्रचार करीत असल्याने स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते संतापले आहेत. याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, देशमुख यांच्याबाबत तक्रार आली आहे. या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी दोन दिवसात चंद्रकांत हांडोरे नागपुरात दाखल होतील. सविस्तर माहिती घेऊन अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करतील. त्यांच्या अहवालात देशमुख हे दोषी असल्याचा निष्कर्ष आला, तर देशमुख यांच्यावर निश्चतपणे कारवाई केली जाईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले.
पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई
- भाजपशी लढा देण्यासाठी, पक्षाला ताकद देण्यासाठी सामान्य कार्यकर्ता झटत आहे. अशात कोणताही मोठा नेता पक्षविरोधी भूमिका घेत असेल, भाजपला मदत करत असेल, तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. अशांची चौकशी करून कारवाई केली जाईल.
- नाना पटोले, प्रदेश अध्यक्ष, काँग्रेस